| तळा | प्रतिनिधी |
वाढत्या उष्णतेमुळे अंगाला चटके बसत असताना शरीराला थंडावा मिळावा यासाठी नागरिकांची पावले आता कलिंगड खरेदीकडे वळताना दिसत आहेत. तळा शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर कलिंगड विक्रीसाठी आले असून, नागरिकांकडून त्याला चांगली मागणी मिळत आहे.
तळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कलिंगडाची लागवड केली जाते. तालुक्यातील वानस्ते, आमडोशी, बोरघर, बेलघर, पाचघर आदी गावे कलिंगडाच्या शेतीसाठी ही गावे कलिंगडाच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. दरवर्षी तालुक्यात सुमारे 300 ते 400 हेक्टर क्षेत्रावर कलिंगडाची लागवड केली जाते. चविष्ट आणि दर्जेदार उत्पादनामुळे तालुक्यातील कलिंगडाला जिल्हाभरात मोठी मागणी असते.
कलिंगडाचे पीक तयार झाल्यानंतर व्यापारी थेट शेतात जाऊन खरेदी करतात. गेल्या वर्षी प्रतिक्विंटल पाच ते सहा हजार रुपयांचा दर असलेले कलिंगड यावर्षी दुपटीने महागले असून, सध्या प्रतिक्विंटल दहा ते अकरा हजार रुपये दराने विक्री होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. प्रतिहेक्टर सुमारे 200 ते 300 क्विंटल उत्पादन मिळते. रब्बी हंगामात बागायती पीक म्हणून कलिंगडाची लागवड केली जाते. सध्या तापमानात मोठी वाढ झाल्याने उष्णतेपासून दिलासा मिळावा म्हणून नागरिकांकडून कलिंगड खरेदीला अधिक पसंती मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.







