| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यात सोमवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली होती. रात्री सुद्धा एक-दोन सरी बरसल्या. त्याचप्रमाणे मंगळवारी पहाटे मुसळधार पाऊस पडला होता. यानंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार तीन दिवस कडक ऊन पडत असल्यामुळे हवामानामध्ये प्रचंड उष्मा निर्माण झाला आहे. पाऊस पडून गेलेला असल्यामुळे वातावरणातील सापेक्ष आर्द्रता खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे नागरिकांना उष्म्या सोबतच प्रचंड घाम येण्याचा अनुभव देखील सहन करावा लागत आहे. त्यातच दोन दिवस पडलेल्या हलक्या पावसानंतर महावितरणच्या वीज वितरणामध्ये वारंवार अडथळे तयार होत आहेत. थोडा जरी पाऊस पडला तरी वीज पुरवठा त्वरित खंडित होतो. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर काही दुरुस्तीचे काम निघाल्यानंतर दोन ते चार तास वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. त्यामुळे नागरिकांना उष्णतेचा त्रास अधिकच सहन करावा लागत आहे.