| रसायनी । वार्ताहर ।
रसायनी-कोन महामार्गावर सोमाटणे गावाजवळ अपोलो लॉजिस्टीक लिमिटेडकडे येणार्या अवजड मालवाहतूक कंटेनरची पार्कींग मुख्य रस्त्यावरच केली जाते. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना व छोट्या वाहनांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अपोलो लॉजिस्टिक लिमिटेड कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ट्रेलरची लांबलचक लाईन लागल्याने अनेकदा वाहतुक खोलंबा होत आहे.यावेळी आजारी पेशंट रुग्णवाहिकेतून नेताना वाहतूक कोंडी होत असल्याने वेळेवर उपचार न मिळाल्याने रूग्णाचा जीव धोक्यात येण्याच्या काही घटना याअगोदर घडल्या आहेत.
रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आल्याने अवजड वाहने रस्त्याच्या दोन्ही साईडला पार्किंग केली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.यामुळे दुचाकी, चारचाकी गाड्यांना दोन गाड्यांमधून रस्ता काढणे अवघड होऊन बसले आहे. त्यातच छोटे-मोठे अपघात होत आहेत. छोट्या वाहन चालकांच्या जीवाशी खेळ करत आहेत. शासनाने व वाहतूक शाखेने याकडे त्वरित लक्ष देऊन रस्त्यावरील अवजड वाहनांची होणारी वाहतूककोंडीची समस्या सोडवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.