| पनवेल | वार्ताहर |
पाच हजाराच्या घरात लोकसंख्या असलेल्या तळोजा गावातील रहिवाशांची कचऱ्याच्या दुर्गंधीने घुसमट सरू आहे. या वसाहतीच्या मुख्य रस्त्यावरील प्रवेशद्वाराच्या कचरा टाकला जात असल्याने पसरलेल्या दुर्गंधीने नागरिकांना तोंडावर रुमाल ठेवून प्रवास करावा लागत आहे.
तळोजा गावात प्रवेश करण्यासाठी पनवेल मुंब्रा आणि खारघर सेक्टर चाळीस सिडकोच्या बागेश्री गृहनिर्माण सोसायटीकडून तळोजा गावात जाण्यासाठी दोन प्रवेश मार्ग आहे. बहुतांश नागरिक खारघरकडे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. शालेय विद्यार्थी शाळेत जाताना बागेश्री गृह निर्माण सोसायटी असलेल्या याच रस्त्यावरून ये-जा करतात. शिवाय तळोजा मार्केट याच ठिकाणी असल्यामुळे भाजीपाला, फळे आदी किरकोळ साहित्य खरेदीसाठी बागेश्री सोसायटीमधील नागरिक तळोजा गावात येत असतात. त्यामुळे गावात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे साचले असून घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
महापालिकेचे दुर्लक्ष स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पालिकेकडून शहरी भागात दैनंदिन स्वच्छता केली जाते. मात्र, गावाकडे दुर्लक्ष केले जात आहे. आजही तळोजा, खारघर, मुर्बी, पेठ, ओवे, रांजणपाडा आणि इतर गावाच्या प्रवेशद्वार आणि गल्लीबोळात कचऱ्याचे ढिगारे दिसून येतात. त्यामुळे पालिकेने शहरीप्रमाणे गावाच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.






