वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

चार किमी रांगा, पोलिसांची दमछाक

माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव शहरात सलग लागलेल्या सुट्ट्या त्यातच लगीनघाई आणि पर्यटकांची कोकणात उसळलेली गर्दी यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीशी सामना करावा लागला. त्यातच दरवर्षीप्रमाणे यंदाचे वर्षीही मोठ्या प्रमाणात एप्रिल व मे महिन्यात लग्न असल्याने अनेकांची लगीनघाई तर काहीची उन्हाळी सुट्टीसाठी लगबग त्यातच पर्यटकांची गर्दी यामुळे महामार्गावर तासन्‌‍तास प्रवाशांची राखडपट्टी होत आहे.
गेल्या महिन्यापासून सुट्ट्या शुक्रवार, शनिवार, रविवार तर कधी शनिवार, रविवार, सोमवार अशा आल्याने निसर्गाचे आकर्षण पर्यटकात वाढले असून, मुंबई, पुणे व इतर जिल्ह्यातून पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणात उसळले आहेत. त्यामुळे माणगाव शहरात वाहतूक कोंडीवर यांचा ताण पडत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीने गेले महिनाभरापासून  माणगावकरांची डोकेदुखी कायम राहिली आहे.
कोकण भ्रमंती नंतर पर्यटकांचे लोंढे निघाले परतीला निघाले आहेत.  महामार्गावर दोन्ही बाजूंनी चार, चार कि.मी रांगा लागल्या होत्या त्यामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. कोकणातून पर्यटक परतीच्या प्रवासाला निघाल्यामुळे वाहतूक कोंडीचा मात्र नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई, पुणे व इतर जिल्ह्यातून पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणात आले होते.
माणगाव बाजारपेठेतील पुणे-निजामपूर-माणगाव रस्ता, मोर्बा मार्ग तसेच मुंबई-गोवा महामार्गावर प्रवासी पर्यटकांच्या वाहनांच्या रांगा  लागल्या होत्या. माणगाव बायपास रस्त्याचे काम थांबल्यामुळे वाहतूक कोंडीवर आणखीनच भर पडली आहे. मात्र, या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम जलद गतीने झाल्यास माणगाव बाजारपेठेतील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघेल अशी पर्यटकातून चर्चा होत आहे.

Exit mobile version