मोकाट गुरांमुळे नागरिक त्रस्त

शांतता समितीच्या बैठकीत प्रश्न ऐरणीवर; कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी

| म्हसळा | प्रतिनिधी |

तालुका शहरातील प्रमुख रस्ते, चौक तसेच बाजारपेठ परिसरात मोकाट गुरांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या मधोमध गुरे बसत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे.

विशेषतः दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना मोकाट गुरांपासून बचाव करत मार्गक्रमण करावे लागत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसलेली गुरे वाहनचालकांच्या सहज लक्षात येत नसल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच गुरांचा मुक्त वावर आणि रस्त्यावर होणारी घाण यामुळे शहरातील स्वच्छतेचाही प्रश्न निर्माण झाला असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. मोकाट गुरांचा प्रश्न म्हसळा तालुका शांतता समितीच्या बैठकीतही चर्चेला आला. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या समस्येवर केवळ तात्पुरती उपाययोजना न करता कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा अशी मागणी समिती सदस्यांनी म्हसळा पोलिसांकडे केली आहे. मोकाट गुरांना सुरक्षित ठिकाणी हलविणे, संबंधित पशुपालकांचा शोध घेऊन त्यांना जबाबदार धरणे तसेच गुरे पुन्हा रस्त्यावर येणार नाहीत यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. शहरातील वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी नगरपंचायत प्रशासन व पोलिसांनी समन्वयाने तातडीने कार्यवाही करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. मोकाट गुरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी जोरदार मागणी म्हसळा शहरातून होत आहे.

Exit mobile version