| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यात उनाड गुरेढोरे व घोडे हे पादचाऱ्यांसाठी मोठी समस्या झाली आहे. तसेच, शेती-वाड्यांमध्ये जात पीकांचे नुकसान करणे या कारणाने बागायतदार हवालदिल झाले आहेत. रात्री-अपरात्री रस्त्यावरून भटकणारे घोडे, ढोरांमुळे आता अपघातास होत असून स्थानिक प्रशासन बघ्याची भुमिका घेत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
तालुक्यात गेल्या दिड ते दोन वर्षांपासून पाळीव प्राण्यांबाबतीत मालकांकडून निष्काळजीपणा दाखवण्यात येत आहे. या प्राण्यांना गोठा, तबेल्यात बांधून न ठेवता मोकाट सोडल जात आहे. अन्न-पाण्याच्या शोधात भटकणारे हे पाळीव प्राणी वाड्यांमध्ये शिरत लागवड केलेल्या फळबागांचे नुकसान करत आहेत. आराठी येथे पर्यटकांच्या वाहनाला घोड्याने धावत येत धडक दिल्याची घटना पंधरा दिवसांपूर्वी घडली होती. रात्री अपरात्री रस्त्याच्या मधोमध अथवा कडेला उभ्या राहणाऱ्या घोड्यांमुळे गेल्या पाच दिवसात भट्टीचा माळ व बोर्लीपंचतन येथे दुचाकीस्वार घोड्यावर आदळल्याच्या घटना घडल्या असून या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत.
उनाड घोड्यांमुळे झालेल्या अपघातांची गंभीरता लक्षात घेऊन श्रीवर्धन शहर व तालुक्यातील नागरिकांनी सोमवार (दि.8) सप्टेंबर रोजी तहसीलदार, पंचायत समिती श्रीवर्धन नगरपरिषद, पोलीस ठाणे येथे निवेदन दिले. यावेळी अविनाश कोळंबेकर, समाजसेवक हिदायत जमायत, जुनैद दुस्ते यांनी प्रशासनाने उनाड घोडे, ढोरे यांच्या मालकांवर कारवाई करावी तसेच मोकाट गुराढोरांचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्ही ढोरांना, घोड्यांना पकडून शासकीय कार्यालयात आणून बांधू असा इशारा दिला. श्रीवर्धन नगरपरिषद मुख्याधिकारी विराज लबडे यांनी श्रीवर्धन नगरपरिषद हद्दीत उनाड घोडे, ढोरे आढळल्यास संबंधित मालकांवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. परंतु पंचायत समिती, गटविकास अधिकारी माधव जाधव यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळले आहे.
बंदोबस्ताची मागणी
श्रीवर्धन ग्रामपंचायत हद्दीतील उनाड घोडे व ढोरे यांचा बंदोबस्त करावा या बाबतीत ग्रामस्थांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी माधव जाधव यांना निवेदन दिले होते, त्यानुसार 01 जुलै रोजी गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंच, प्रशासक, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत हद्दीतील मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. परंतु, गटविकास अधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवण्यात आली.







