| तळा | वार्ताहर |
तळा शहरातील नागरिक वन्य माकडांमुळे हैराण झाले असून, त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तळा शहरात अन्नाच्या शोधात ही माकडे मानवी वस्तीकडे वळली असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर असणारी माकडे झाडांवरील फळे खाऊन राहात असत, तसेच तळगड किल्ला पाहण्यास येणारे पर्यटक माकडांना आपल्याकडील खाद्य पदार्थ खाण्यास देत असत. मात्र, काही वर्षांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे गडावरील झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. तसेच, गडावर माकडांसाठी खाद्य पदार्थ घेऊन जाणाऱ्या पर्यटकांची संख्यादेखील मंदावली असल्याने माकडांना खायला खाद्य उरले नाही. परिणामी, अन्नाच्या शोधात या माकडांना मानवी वस्तीत यायची वेळ आली आहे. ही वन्य माकडे पुसाटी व वडाचीवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतीची नासाडी करतात तसेच जोगवाडी, मधली आळी, सोनार आळी, कासार आळी, कुंभार आळी बाजारपेठ आदी गावातील नागरिकांच्या घरात घुसून अन्नाची नासाडी करून साहित्यांचीदेखील नुकसानी करीत आहेत. त्यामुळे येथील रहिवासी पुरते वैतागले आहेत.
याबाबत तळा वनविभाग अधिकारी यांच्याकडे संपर्क साधला असता आम्ही यामध्ये काहीही करू शकत नाही. नागरिक माकडांना खायला देतात, त्यामुळे ती वस्त्यांकडे वळली आहेत. नागरिकांनी खायला देणे बंद केले तर ती पुन्हा जंगलाकडे वळतील. त्यामुळे माकडांना खाद्यपदार्थ देऊ नका, अशी भित्तीचित्रे आम्ही महत्त्वाच्या ठिकाणी लावणार आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.







