महावितरण विरोधात लाक्षणिक उपोषण
। वेणगाव । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यात सतत खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्याबाबत येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येचे निवारण होत नसल्यामुळे कर्जत तालुका वीज ग्राहक समितीच्यावतीने महावितरण कार्यालयावर 20 जुलै रोजी मूक मोर्चा नेण्यात आला होता. यानंतर 30 जुलै रोजी महावितरणचे अधिकारी प्रकाश देवके यांच्यासोबत समितीच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. मात्र, बैठकीत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने गुरूवारी (दि.1) यादव फार्महाऊस येथे पार पडलेल्या बैठकीत समितीच्यावतीने 12 ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण करण्याचा ठराव करण्यात आला.
कर्जत तालुक्यात 20 जुलै रोजी महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला होता. यानंतर समितीच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेऊन महावितरणने समस्यावर तोडगा काढणे अपेक्षित होते. परंतु, तसे न झाल्याने समितीने पुढील दिशा ठरण्यासाठी 28 जुलै रोजी कर्जत शहरातील शनी मंदिर येथे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीबाबत माहिती मिळताच महावितरण कार्याकडून समितीला 30 जुलै रोजी चर्चेसाठी बोलण्यात आले होते. यावेळी समितीचे शिष्ट मंडळ आणि महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रकाश देवके यांच्यात चर्चा झाली. समितीने 20 जुलै रोजी दिलेल्या निवेदनातील समस्यांवर महावितरणकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळणे तसेच प्रत्येक समस्येचा लेखी खुलासा व कार्यालयाबाबतचे लेखी पत्र देणे अपेक्षित होते, ते महावितरणकडून देण्यात आले नाही.
या आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेऊन महावितरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणे अपेक्षित होते. परंतु, या बैठकीमध्ये कुठल्याही वरिष्ठ अधिकार्याचा सहभाग नव्हता. या सर्व पार्श्वभूमीवर वीज वितरण कार्यालयाकडून कर्जत तालुक्याच्या समस्या गांभीर्याने घेतल्या जात नाहीत. म्हणून महावितरण विरोधात वीज ग्राहक समितीने 12 ऑगस्ट रोजी बेमुदत लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा चे निवेदन कर्जत पोलीस ठाण्याचे पो. निरीक्षक सुरेंद्र घरड, तहसील शीतल रसाळ यांना देण्यात आले आहे.