जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा सावळागोंधळ
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. दुरुस्ती करण्यास विलंब होत असल्याचा फटका जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना बसत आहे. रुग्णालय प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे रुग्णांचे हाल होत आहे. सिटीस्कॅन विनाच रुग्णांना परतावे लागत आहे. त्यामुळे रुग्ण प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालय 1980-81 या कालावधीत उभारले. तीन मजली असलेल्या इमारतीमध्ये 250 खाटांचे रुग्णालय आहे. या रुग्णालयात दर दिवशी सुमारे 600हून अधिक रुग्ण बाह्यरुग्ण कक्षामध्ये उपचारासाठी येतात. पोलादपूरच्या टोकापासून पनवेल, उरण अशा अनेक तालुक्यांतील शहरी व ग्रामीण भागातील रुग्ण अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येतात. रुग्णालयांमध्ये चांगली सेवा मिळेल या आशेने जाणाऱ्या रुग्णांची घोर निराशा होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
जिल्ह्यातील तळागाळातील घटकाला चांगली आरोग्यसेवा देण्याचा दावा रुग्ण प्रशासनाकडून कायमच केला जात आहे. मात्र, जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह दंतचिकित्सक, परिचारिका, प्रशासन अधिकारी, अधिपरिचारिका अशी अनेक पदे रिक्त असल्याची ओरड कायमच आहे. त्यात कार्यरत डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या भरोवशावर रुग्णालयाचा कारभार चालविला जात आहे. खासगी दवाखान्यात सिटीस्कॅन महाग आहे. ते दर सर्वसामान्यांना न परवडण्यासारखे आहेत. अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन गेल्या अनेक वर्षांपासून आहे. दरदिवशी अनेक रुग्ण सिटीस्कॅन करण्यासाठी येतात. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून ही मशीनच बंद पडल्याची माहिती रुग्णालयातून समोर आली आहे. या मशीनची ट्यूब गेली आहे. ती ट्यूब युनिक वेलनेस या संस्थेमार्फत बसविली जाणार आहे. परंतु, अद्यापपर्यंत ही ट्यूब उपलब्ध झाली नाही. त्यामुळे या मशीनची दुरुस्ती झाली नाही. गेल्या दहा दिवसांपासून सिटीस्कॅनविना उपचार करण्याची वेळ रुग्णांवर आली आहे. आरोग्य विभागाचा सावळागोंधळ यातून दिसून येत आहे.
मागील काही दिवसांपूर्वी उपचारासाठी एका रुग्णाला घेऊन अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात गेलो होते. त्यावेळी बाह्य कक्ष विभागातील डॉक्टरांनी बाहेरून सिटीस्कॅन करण्यास सांगितले. त्यांना विचारणा केली, त्यावेळी रुग्णालयातील मशीन बंद पडल्याची बाब समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मशीन बंद पडली आहे. त्यावर तातडीने उपाय करण्यास प्रशासन उदासीन ठरत आहेत.
दिपक पाटील,
सामाजिक कार्यकर्ते
सिटीस्कॅन मशीनमधील ट्यूब गेली आहे. बंद पडलेल्या ट्यूबच्या जागी नवीन ट्यूब बसविली जाणार आहे. युनिक वेलनेस या संस्थेकडून ती ट्यूब मागविण्यात आली आहे.
डॉ. निशीकांत पाटील,
जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड
