माणगावात रुग्णांच्या सेवेला सिटीस्कॅन

| माणगाव | प्रतिनिधी |

दक्षिण रायगडमधील तसेच महामार्गावरील अपघातग्रस्त व इतर रुग्णांना तातडीचे उपचार मिळावेत यासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन मशीनची अत्यंत गरज होती. या सिटीस्कॅन मशीनसाठी अनेक रुग्ण व नातेवाईकांकडून मागणी होत होती. ही सिटीस्कॅन सेवा गरीब व सामान्य रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोफत मिळणार आहे. खाजगी व इतर ठिकाणी उपचार घेणाऱ्या रुग्णांना ती अत्यल्प दरात उपलब्ध राहणार आहे.

सिटीस्कॅन उपजिल्हा रुग्णालयात बसविले असून रुग्णांच्या सेवेला आता ते उपलब्ध झाले आहे. माणगावात हे सिटीस्कॅन सेवा सुरु झाल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपजिल्हा रुग्णालयात बसविलेले सिटीस्कॅन मशीन ही एका खाजगी कंपनीमार्फत सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर शासनांनी बसविले आहे. ही सेवा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व क्रस्ना डायग्नोस्टिक्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर बसविण्यात असून ते 24 तास अत्यावश्यक सेवा म्हणून उपलब्ध राहणार आहे. या मशीनसाठी स्वंतत्र वातानुकूलित खास कक्ष उभारण्यात आला आहे.

दक्षिण रायगडमध्ये शासकीय सिटीस्कॅनची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना खाजगी सिटीस्कॅन करून घ्यावे लागत होते. त्याचे दर अव्वाची सव्वा असून ते सामान्य व गरीब रुग्णांना परवडणारे नाहीत. उपजिल्हा रुग्णालयातील हे मशीन सुरु झाल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण त्यांच्या नातेवाईकांना उपयोग होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, दापोली, मंडणगड व मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त व लहान मोठया आजारावरील रुग्णांवर तातडीचे उपचार व्हावेत व त्यांचे प्राण वाचावे यासाठी माणगाव येथे मध्यवर्ती ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय उभारले आहे. अपघातग्रस्त व अन्य रुग्णांवर इथेच उपचार व्हावेत व त्यांचे प्राण वाचावे यासाठी माणगावला सिटीस्कॅनची गरज होती. मुंबई-गोवा महामार्गावर लहान मोठा अपघात झाल्यास त्याच्यावर तातडीने उपचार करून त्यांचे प्राण वाचावे यासाठी माणगाव येथे शासनांनी शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारले आहे. येथे सध्या लहान-मोठया शस्त्रक्रिया केल्या जातात.

Exit mobile version