सिटीस्कॅनमुळे रुग्णांना मिळणार जीवदान

माणगावात सिटीस्कॅनची प्रतीक्षा संपली

| माणगाव | वार्ताहर |

दक्षिण रायगडमधील तसेच महामार्गावरील अपघातग्रस्त व इतर रुग्णांना तातडीचे उपचार मिळावेत यासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन मशीनची अत्यंत गरज होती. ही सिटीस्कॅन मशीन एका खाजगी कंपनीमार्फत शासनांनी बसवली असून ती अवघ्या तीस दिवसात अपघातग्रस्त व गंभीर आजाराच्या रुग्णावर निदान करण्यासाठी ती सज्ज होणार आहे. या सिटीस्कॅनमुळे रुग्णावर निदान करून योग्य उपचार होणार असल्याने अशा रुग्णांना जीवदान मिळणार आहे. या सिटीस्कॅन मशीन बसविण्याचे काम पूर्ण झाले असून ती लवकरच नागरिकांच्या सेवेला उपलब्ध होणार असल्याने रुग्ण व नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

यापूर्वीची माणगाव उपजिल्हा रूग्णालयातील सिटीस्कॅन मशीन तब्बल सात वर्षापासून बंदच होती. या मशिनच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून अनेक वेळा तांत्रिक उपचार करण्यात आले. मात्र हे कोमात गेलेले सिटीस्कॅन मशीन सात वर्षानंतरही शुद्धीवर आलेच नाही. अखेर सिटीस्कॅन मशीनचे संबंधित तंत्रज्ञ बोलावून मशीनची पाहणी केली असता हे सिटीस्कॅन मशीन डेथ असल्याने ते भंगारात (निर्लेखन) करण्यात यावे असा माणगाव उपजिल्हा रुग्णालयाला दाखला दिला होता. त्यानंतर शासनांनी माणगाव उपजिल्हा रूग्णालयात नवीन सिटीस्कॅन मशीन एका खाजगी कंपनीमार्फत बसविण्यासाठी परवानगी दिली. सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर बसविले असून उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांना मोफत तर खाजगी रूग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांना बाजारातील महागडे सिटीस्कॅन न करता ते अत्यल्प दरात केले जाणार आहे. ते मशीन कांही दिवसात रुग्णांच्या सेवेला उपलब्ध होणार आहे. तर या मशीनसाठी स्वंतत्र वातानुकूलित खास कक्ष करण्यात आला आहे. त्यामुळे माणगावकरांची सिटीस्कॅनची प्रतीक्षा आता संपणार आहे.

दक्षिण रायगडमध्ये शासकीय सिटीस्कॅनची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना खाजगी सिटीस्कॅन करून घ्यावे लागत होते. त्याचे दर अव्वाची सव्वा असून ते सामान्य व गरीब रुग्णांना परवडणारे नाहीत. उपजिल्हा रुग्णालयातील हे मशीन दुरुस्त झाल्यास शासनाच्या अत्यल्प दरात रुग्णांना सेवा मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, दापोली, मंडणगड व मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त व लहान मोठया आजारावरील रुग्णांवर तातडीचे उपचार व्हावेत व त्यांचे प्राण वाचावे यासाठी माणगाव येथे मध्यवर्ती ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय उभारले आहे. परंतु इथे नेहमीच तज्ञ डॉक्टरांची उपेक्षा कायम राहिली आहे. कधी डॉक्टर तर कधी तपासणी व उपचारासाठी लागणारी आवश्यक उपकरणें यामुळे रुग्णांना अलिबाग, मुंबई येथे पाठविले जाते. अपघातग्रस्त व अन्य रुग्णांवर इथेच उपचार व्हावेत व त्यांचे प्राण वाचावे यासाठी माणगावला सिटीस्कॅनची गरज होती.

उपजिल्हा रुग्णालयात बसविण्यात आलेली सिटीस्कॅन मशीन क्रष्णा डायगनॉस्टिक लि. पुणे. यांच्या मार्फत बसविण्यात आली असून हे काम पूर्ण झाले असून ते लवकरच सेवेला येत आहे. त्यामुळे रुग्ण व नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावर लहान मोठा अपघात झाल्यास त्याच्यावर तातडीने उपचार करून त्यांचे प्राण वाचावे यासाठी माणगाव येथे शासनांनी शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारले आहे. येथे सध्या लहान-मोठया शस्त्रक्रिया केल्या जातात परंतु अनेक वेळा मुंबई-पुणे शहरातून तज्ञ डॉक्टर या ग्रामीण भागात काम करण्यास इच्छुक राहात नाहीत. कधी या रुग्णालयात विविध तज्ञ डॉक्टरांची कमतरता तर कधी विविध टेक्निशियन व संबंधित उपचार करण्याच्या तपासणी मशीनमुळे रुग्णांना अलिबाग, मुंबई येथे पुढील उपचारार्थ धाव घ्यावी लागत होती.

Exit mobile version