जिल्हा सामान्य रुग्णालय झाले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आजपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये उसर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालयाचेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रुपांतरण करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नामकरण करुन जिल्हा सामान्य रुग्णालय नाव असलेली पाटी बदलून त्याऐवजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय असे नाम फलक लावण्यात आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर यांनी याबाबतची माहिती दिली. लवकरच केंद्रीय पथक भेट देऊन पहाणी करणार आहे. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम सुरु होणार असलयाचे त्यांनी सांगितले.
वैद्यकीय महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष आरसीएफ वसाहतीमधील घेण्यात आलेल्या इमारती व रायगड जिल्हा रुग्णालय यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष सुरु करण्यात येणार आहे. यासाठी शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी गट – अ ते गट – क मधील नियमित 185 पदे व विद्यार्थी पदे 121 त्याचप्रमाणे गट-क ( बाह्यस्त्रोताने ) 139 पदे व गट- ड ( बाह्यस्त्रोताने ) 65 पदे अशी एकूण 510 व 4 टप्यात निर्माण करण्यास नुकतीच राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मान्यता दिली आहे.
मंजूर 510 पदांमध्ये गट – अ मध्ये एक अधिष्ठाता, 21 प्राध्यापक, 22 सहयोगी प्राध्यापक , एक मुख्य शासकीय अधिकारी अशा 45 पदांचा समावेश आहे . गट – ब मध्ये 46 सहाय्यक प्राध्यापक व एक प्रशासकीय अधिकारी अशा 47 पदांचा समावेश आहे. गट- क मध्ये एक ग्रंथपाल, एक सांख्यिकी सहाय्यक, दोन कार्यालयीन अधीक्षक, नऊ लघुलेखक, चार वैद्यकीय समाजसेवक, 15 वरिष्ठ सहाय्यक, एक रोखपाल, 9 प्रयोगशाळा वाहतूक तंत्रज्ञ, 2 सहाय्यक ग्रंथपाल, 13 वरिष्ठ लिपिक, एक लघुटंकलेखक, दोन भांडारपाल, 31 कनिष्ठ लिपिक, एक ग्रंथसूचीकार फोटो एक प्रक्षेपक अशा एकूण 93 पदांचा समावेश असून बाह्यस्त्रोताने हिसकावून भरती होणारी वर्ग -3 ची एकूण 139 तर वर्ग -4 ची एकूण 65 मंजूर करण्यात आली आहेत.
विद्यार्थी पदे एकूण 121 असून त्यामध्ये चिकित्सालयीन पाम्यनिदेशक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, निवासी या पदांचा समावेश आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ टप्यातील पदे टप्पा निहाय मंजूर होणार असून, प्रथम वर्षाबाबतची पदे तात्काळ निर्माण होतील व उर्वरीत द्वितीय, तृतीय व चतुर्थ टप्यातील पदे संबंधित वर्षी निर्माण होतील .
अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकानुसार वर्षनिहाय, आवश्यक पदनामनिहाय पदनिर्मिती आवश्यक असल्यामुळे संचालक , वैद्यकीय शिक्षण व संशोधन , मुंबई यांनी सादर केल्यानुसार अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता निर्माण करावयाच्या पदांच्या पदनामनिहाय पदनिर्मितीस शासनाची मंजूरी प्राप्त झाली आहे.
अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या इमारतीची प्रशासकीय मान्यता प्राप्त होताच, इमारतीचे प्रत्यक्ष बांधकाम त्वरित सुरु करण्यात येऊन जून 2021 मध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष आरसीएफ वसाहतीमधील घेण्यात आलेल्या इमारती व रायगड जिल्हा रुग्णालय यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष सुरु होणार असून, नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होताच नव्या इमारतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होईल.

Exit mobile version