सिव्हिलचे सिटीस्कॅन पुन्हा बंद

 रुग्णांचे हाल, व आर्थिक भुर्दंड

  अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे. उपचारासाठी येणार्‍या रुग्णांची गैरसोय होत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये नाराजीचे सुर उमटत आहे. रुग्ण प्रशासन निद्रावस्थेत असल्याची संतप्त प्रतिक्रीया रुग्णांच्या नातेवाईकांकडून व्यक्त केली जात आहे.
 सर्वसामान्य रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावेत यासाठी 35 वर्षापुर्वी अलिबाग या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालयत उभारण्यात आले. 250 खाटांचे असलेल्या या रुग्णालयात रोज पाचशेपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येतात.  रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी रुग्ण प्रशासन प्रयत्न करीत आहेत. मात्र हे प्रयत्न फक्त कागदावर असल्याचे चित्र समोर आले आहे. अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्जन गेल्या अनेक वर्षापासून नसल्याने रुग्णांना अन्य रुग्णालयात हालवावे लागत आहे. तसेच या रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे. बंद असल्याचे कारण स्पष्ट होत नसल्याने रुग्णदेखील संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या या कारभाराबाबत रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमध्ये नाराजीचे सुर उमटत आहे. रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन मध्ये बिघाड झाला आहे. ही मशीन दुरुस्ती करण्यास विलंब होत असल्याने उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना खासगी ठिकाणी जाऊन सिटीस्कॅन करावे लागत आहेस सिटिस्कॅनची सुविधा अलिबागमध्ये नसल्याने पेण अथवा पनवेलमध्ये जाण्याची वेळ येत आहे. त्याचा फटका रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना बसत आहे. रुग्ण प्रशासन याकडे  गांभीर्याने घेत नसल्याने रुग्णांची प्रचंड  गैरसोय होत आहे. याबाबत जिल्हा साामान्य रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्याशी  संपर्क साधला असता, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

Exit mobile version