पूर्ववैमनस्यातून रागातून दोन गटात हाणामारी

| तळा | वार्ताहर |

तळा तालुक्यातील रहाटाड कोळीवाडा येथे मागील भांडणाच्या रागातून दोन गटात हाणामारी झाली असून, परस्परांविरुद्ध तळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील रहाटाड येथे ग्रामपंचायत कार्यालयात लक्ष्मी चांग्या पाटील यांच्या जागेच्या अर्जासंबंधी चौकशीसाठी उपस्थित असलेल्या दोन गटांमध्ये मागील भांडणाचा राग मनात धरून हाणामारी झाली. या हाणामारीत चांगदेव रामा पाटील यांच्या उजव्या डोळ्याच्या कोपर्‍यावर किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेबाबत तळा पोलीस ठाण्यात हाताबुक्क्याने मारहाण, शिवीगाळ व जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास स.पो.नि. गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. एम.एच. खिरीट हे करीत आहेत.

Exit mobile version