| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील निजामपूर येथे किरकोळ कारणास्तव दोन गटात हाणामारी होऊन दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी तक्रारी माणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्यावर दोन्ही गटातील एकूण 11 आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि.8) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आरोपीच्या घरासमोर घडली.
निकिता अनुराज सावंत, रुपेश मनोहर जाधव व मनोहर काशीराम जाधव हे एकाच गावात राहणारे आहेत. निकिता अनुराज सावंत व दीर राज गायकवाड असे मोटार सायकलवरून निजामपूर बाजारपेठेतून घरी येत असताना गावातील सार्वजनिक रस्त्यावर रुपेश मनोहर जाधव याने त्याची कार रस्त्यात उभी केली होती. ती बाजुला घेण्यास निकिता अनुराज सावंत यांनी सांगितले. याचा रुपेश मनोहर जाधव व मनोहर काशीराम जाधव यांना या गोष्टीचा राग आल्याने त्यांनी सावंत बंधुंना मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी आलेले सासरे यांनाही मनोहर काशीराम जाधव यांनी लाठीकाठीने पाठीवर मारहाण केली. तसेच नामचंद्र सावंत, आर्यन नाक्ते, राज सावंत, कन्हय्या सावंत यांनाही हाताबुक्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसर्या गटाकडून रुपल रुपेश जाधव (वय-25) रा. आम्रपाली नगर निजामपूर ता. माणगाव यांनी फिर्याद दिली आहे. रुपल रुपेश जाधव व आरोपी अनुराज नामचंद्र सावंत, नामचंद्र शिवराम सावंत, राज नामचंद्र सावंत, निकिता अनुराज सावंत, राज संदेश गायकवाड, कन्हय्या आत्माराम सावंत, स्वातन सावंत, आत्माराम शिवराम सावंत, भाई नाक्ते हे एकाच गावात राहणारे आहेत. त्यांच्या मालकीची कार घरासमोर थांबवून घर सामान उतरवत असताना यांतील आरोपी अनुराज नामचंद्र सावंत याने मला घरी जायचे आहे असे सांगितले असता यांतील फिर्यादी यांचे सासरे घर सामान उतरविल्यावर जा असे म्हणाले. या गोष्टीचा आरोपी याने मनात राग धरून वरील सर्व आरोपींनी संगनमत करून जमाव करून फिर्यादी व साक्षीदार याना हाताबुक्क्यांनी, लाथांनी, लाकडी बांबूने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या हाणामारीत फिर्यादी यांचे कपडे फाटून गळ्यातील मनी मंगळसूत्र व साक्षीदार यांची अंगठी कोठेतरी पडून नुकसान झाले. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार श्री. दोडकुलकर हे करीत आहेत.