रिलायन्स कंपनीत दोन गटात तुंबळ हाणामारी; एकजण गंभीर जखमी

परस्पर विरोधी गुन्हे दाखल

| नागोठणे | वार्ताहर |

नागोठण्याजवळील रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीत कामगार पुरविणे तसेच ठेकेदारी पद्धतीने कामे करण्यावरून सोमवारी (दि.20) रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास शिहू-मुंढाणी (ता.पेण) परिसरात राहणाऱ्या दोन गटात वाद निर्माण झाले. या तुंबळ हाणामारीत धारदार तलवारीने एकाच्या मानेवर वार केल्याने गंभीर जखमी झाला. तर, दुसऱ्या एकाच्या या हाणामारीत हाताला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने फ्रॅक्चर झाला आहे. यासंदर्भात नागोठणे पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील दोन्ही गटातील आठ जणांना नागोठणे पोलिसांकडून तात्काळ अटक करण्यात आली आहे.

नागोठणेजवळील रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीत शिहु मुंढाणी परिसरात राहणाऱ्या यातील फिर्यादी व आरोपींचे कॉन्ट्रॅक्ट असून यांच्यात मुंढाणी फाटा शिहू या ठिकाणी कंपनीत कामगार पुरविणे यावरून वाद निर्माण झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्याचे रुपांतर तुंबळ हाणामारीत झाले. यावेळी या हाणामारीत संकेत उर्फ संकेश शैलेश चोरगे (रा. बेणसे-पेण) याच्या मानेवर तलवारीने वार केल्याने तो गंभीररित्या जखमी झाला असून त्याला पेण येथील डॉ.म्हात्रे यांच्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे, तर दिपक कमलाकर घासे (रा. मुंढाणी-पेण) याच्याही हाताला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने फ्रॅक्चर झाला. त्याला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, या तुंबळ हाणामारीत प्रसाद कुथे, पुंडलिक घासे, प्रवीण कुथे, रणधिर भोईर यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.

दरम्यान प्रसाद नारायण कुथे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दीपक कमलाकर घासे, पुंडलिक कमलाकर घासे, प्रवीण दामोदर कुथे, रणधीर विठ्ठल भोईर यांच्यावर तसेच, पुंडलिक कमलाकर घासे यांच्या फिर्यादीनुसार प्रसाद नारायण कुथे, योगेश जनार्दन ठाकूर, अमोल चंद्रकांत खाडे, संकेत उर्फ संकेश शैलेश चोरगे, मच्छिंद्र लक्ष्मण ठाकूर, सुरेंद्र बंडू कुटे उर्फ भुऱ्या यांच्यावर नागोठणे पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले असून यातील दोन्ही गटातील आरोपी यांना नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हरेश काळसेकर यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ अटक करण्यात आली. तसेच, दोघे जण रुग्णालयात उपचारार्थ दाखल असल्याने त्यांना अटक केली नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक पुष्कराज सूर्यवंशी यांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळी भेट दिली. यातील अटक करण्यात आलेल्या आठही आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर करीत आहेत.

Exit mobile version