अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून दमदाटी व धमकी
। पुणे । प्रतिनिधी ।
बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा पवार विरुद्ध पवार असा थेट सामना होत असल्याने हा मतदारसंघ अतिशय संवेदनशील बनला आहे. येथील मतदारसंघात पुतण्या युगेंद्र पवार विरुद्ध काका अजित पवार यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघातील बुथवर दोन्ही कार्यकर्ते समोरा समोर आले होते. त्यातच, युगेंद्र पवार यांच्या मातोश्री शर्मिला पवार यांनी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांवर दमदाटीचे आरोप केले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जातेय. दमदाटी करण्यात येत असल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केला आहे. मतदारांना घडाळ्याचे शिक्के असलेल्या स्लीप वाटण्यात येत आहेत. निवडणूक अधिकार्यांकडे आम्ही याची तक्रार करणार असल्याचेही शर्मिला पवार यांनी म्हटले. त्यावर, आता अजित पवारांनी हे सर्व आरोप फेटाळले असून निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस यंत्रणा याबाबत पाहून घेतील, असे सांगितले.
अजित पवार
आमच्या कार्यकर्त्यांनी कोणालाही धमक्या दिल्या नाहीत. माझा कार्यकर्ता असे कधीही करणार नाही, तो आरोप धादांत खोटा आहे, सीसीटीव्ही कॅमेर्यात सर्वकाही आले असेल. तसे काही असेल तर निवडणूक निर्णय अधिकारी हे पाहतील. माझा माझ्या कार्यकर्त्यांवर पूर्ण विश्वास आहे. तसेच, काही गैरप्रकार वाटत असल्यास पोलीस तक्रारीची चौकशी करतील, असे म्हटले.