| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील बीड बुद्रुक ग्रामपंचायतीच्या कार्यलयात अनौपचारिक चर्चा असताना बाचाबाची झाली. त्या बाचाबाचीनंतर आदिवासी व्यक्तीला शिवीगाळ आणि मारहाण करण्याची घटना घडली असून, त्याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जत पोलीस ठाणे हद्दीत बीड बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये प्रजासत्ताकदिनानिमित्त ग्रामसभा आयोजित केली होती. सभेसाठी आवशयक असलेला कोरम नसल्याने सभा तहकूब करण्यात आली आणि ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच पोलीस पाटील आणि लोकप्रतिनिधी आदी मंडळी गावातील संतोष गवळी आणि दीपक गवळी यांच्या घराचे जागेच्या प्रश्नावर अनौपचारिक चर्च करीत बसले होते.
त्यावेळी नितीन फुलावरे आणि दीपा कदम यांच्यामध्ये त्या घराचे प्रश्नावर चर्चा सुरु असताना दीपा कदम यांचे पती दिनेश कदम आणि नितीन फुलावरे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली, त्यात फुलावरे दिनेश कदम यांच्या लाथ मारली. त्यावेळी उडालेला गोंधळ याची माहिती घेण्यासाठी आणि मध्यस्थी करण्यासाठी तुलसीदास कवठे हे गेले असता त्यांना नितीन फुलावरे यांनी जातीवाचक शिवीगाळ केली तसेच लाथाबुक्क्याने मारहाण केली. याबद्दल तुलसीदास फुलावरे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. याबाबत बीड गावातील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे अधिक तपस करीत आहेत.