कर्जत- हालविली येथे जमिनीच्या वादातून हाणामारी; दोघे जखमी

ॲड. संकेत भासे यांच्यावर रिव्हॉल्व्हर काढून धमकावण्याचा आरोप

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत शहरालगत असलेल्या हालिवली गावाच्या हद्दीत असलेल्या जमिनीचा वाद थेट हाणामारी पर्यंत पोहचला. आमदारांचे भाचे असलेले संकेत भासे यांनी जमीन खरेदी केली असल्याचे बोलले जात असून, त्या ठिकाणी जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावेळी जमिनीचे मूळ मालक आणि जमीन खरेदी करणारे यांच्यात जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील नावावरून हा वाद झाला. दरम्यान या प्रकरणी दोन जखमी झाले असून, संकेत भासे यांनी आपल्या कडील रिव्हॉल्वर काढून धमकावले असल्याचा आरोप होत असून, कर्जत पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल नसल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हालविली ग्रामपंचायत हद्दीतील देऊळवाडी परिसरात एचपी पेट्रोल पंपासमोर भूषण रमेश बोराडे यांची वडिलोपार्जित शेतजमीन आहे. सदर जमिनीचा व्यवहार सुरू असून, तो व्यवहार पूर्ण झाल्यावर कुंपण टाकण्याची कामे करावी असे म्हणणे होते. मात्र, मागील काही दिवस जमीन सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. 38 गुंठे जमीन खरेदीचा हा व्यवहार असून, सातबारा उताऱ्यावरील नावे कमी करण्याचा प्रश्न सुटला नसल्याने हा वाद अखेर रक्तबंबाळ करण्यापर्यंत पोहचला आहे. मंगळवारी भूषण बोराडे हे त्यांचे वडील रमेश बोराडे (70) आणि भाऊ ऋषिराज बोराडे यांच्यासह शेतावर काम करत होते. यावेळी सदर जमीन खरेदी करणारे संकेत भासे हे आपले सहकारी ओमकार हांडे हे तिथे आले. जागेच्या वादातून ओमकार हांडे याने भूषण बोराडे यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार केल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. इतकेच नव्हे तर, 70 वर्षीय वृद्ध वडील रमेश बोराडे यांनाही धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली. यावेळी भासे यांनी जवळ असलेले पिस्तूल उपसून, “जागा कशी देत नाही ते बघतो, तुम्हा सर्वांना आज खपवून टाकतो,” अशी धमकी दिल्याचे बोराडे कुटुंबाचे म्हणणे आहे.

या भीषण हल्ल्यात भूषण बोराडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्या डोक्यावर 5 ते 6 टाके पडले आहेत. त्यांचा भाऊ ऋषिराज याचे बोट फ्रॅक्चर झाले असून छातीवरही वार झाले आहेत. जखमींना तातडीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून, कर्जत पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. कर्जत पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू असून, अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. पोलिसांकडून याबाबत सावधगिरी बाळगली जात असून गुन्हा कोणता नोंद केला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version