शहरातील नाले सफाई फक्त कागदावरच

। महाड । प्रतिनिधी ।

महाड शहरातील अनेक रस्त्यांच्या कडेला असलेल्या गटारातील पाणी थेट रस्त्यावर येऊन तुंबत आहे. यामुळे गटारे आणि नाले सफाई फक्त कागदावरच केली का, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. तसेच, शहरातील गटारे व नाले स्वच्छता केल्याचे नगरपरिषेकडून फक्त भासवण्यात आले असल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत.

पावसाळ्यापूर्वी शहरातील गटारे आणि नाले सफाई होणे आवश्यक असते. महाड पालिकेकडून गटार आणि नालेसफाईवर कायम खर्च केला जात आहे. मात्र, हा खर्च पूर्णतः वाया जात असल्याचे दिसून येत आहे. शहरातील अनेक ठिकाणी आजही नाले आणि गटारे कचरा व मातीने भरलेली आहेत. यामुळे पालिकेकडून करण्यात आलेली गटार आणि नाले सफाई कागदावरच केली गेली का, असा प्रश्‍न ही येथील नागरिक करत आहेत. परिणामी नाल्यातील आणि गटारातील पाणी थेट रस्त्यावर येऊन थांबत आहे. तात्काळ रस्त्यावरील पाणी गटारामध्ये जाण्याकरता जेसीबीने मार्ग काढून दिला असला तरी गटारातील पाणी मोठ्या नाल्यांना मिळत नसल्याने हे पाणी पुन्हा रस्त्यावर येऊन थांबत आहे. यामुळे रस्त्यावर जमलेल्या पाण्यामुळे नागरिकांना तसेच दुचाकीस्वारांना मोठा त्रास होत आहे. पालिकेचा संबंधित ठेकेदार पावसाळ्यापूर्वी केली जाणारी कामे पावसाळ्याच्या तोंडावर करत असल्याने अशी परिस्थीती निर्माण होत असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये होत आहे.

Exit mobile version