। सोगाव । वार्ताहर ।
सामाजिक कार्यात नेहमीच कौतुकास्पद कामगिरी करण्यात अग्रेसर असणार्या अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील सचिन घाडी मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी रामधरणेश्वर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या बंधार्याची उत्स्फूर्तपणे स्वच्छता केली.
या बंधार्याच्या आतील भागात व बाहेरील परिसरात मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे व गवत वाढले होते. तसेच, वाहून आलेला कचरा देखील मोठ्या प्रमाणात साचला होता. यामुळे येथे येणार्या पावसाळी पर्यटकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. हि बाब मूनवली येथील सचिन घाडी व मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर रविवारी (दि.9) बंधार्याच्या आतील भागातील व बाहेरील परिसरातील भागात वाढलेली झाडेझुडपे, वाढलेले गवत, वाहून आलेला कचरा याची उत्स्फूर्तपणे स्वच्छता करत योग्य ती विल्हेवाट लावली. या बंधार्याच्या काही अंशी केलेल्या स्वच्छतेमुळे याठिकाणी येणार्या गावातील व पंचक्रोशीतील तसेच पावसाळी पर्यटकांची होणारी गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. याबद्दल सचिन घाडी मित्रमंडळाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. या स्वच्छता अभियानात निकेश अनमाने, सतिश घाडी, आत्माराम पंडम, प्रसाद मसुरकर, प्रतिक अनमाने, सुयोग अनमाने, संजय अनमाने, गौरव मोंढे, अशोक मोंढे, रोशन अनमाने, गितेश ठकरुळ, अक्षय नागावकर, जयेश ठकरुळ, सार्थक अनमाने, पियुष घाडी, सोहम निकम, तुषार मोंढे, अभिषेक जुईकर व इतर कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.