दैनिक कृषीवलच्या बातमीची दखल
| नेरळ वार्ताहर |
नेरळ गावातील रायगड जिल्हा परिषदेची कुंभार आळी शाळेच्या आवारातील मध्यान्ह भोजन बनविले जाणारे किचन शेड हे गवताचा वेढा होता. त्याबद्दल दैनिक कृषीवलने 1 जानेवारी रोजी सचित्र बातमी प्रसिद्ध केली आणि तालुका पंचायत समितीचे शिक्षण विभाग खडबडून जागा झाला. खुद्द शिक्षण अधिकारी संतोष दौंड यांनी त्या बातमीची दखल घेवून शाळेचा परिसर तसेच किचन शेड परिसर स्वच्छता करून घेण्यात आली. किचन शेडसाठी नवीन स्वतंत्र जागा उपलब्ध करून तेथे पाठीमागील बाजूस असलेले किचन शेड हलविले जाईल अशी माहिती त्यांनी दिली.
नेरळ येथे कर्जत शिक्षण विभाग यांची केंद्र शाळा आहे. पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांना दुपारी मध्यान्ह भोजन दिले जाते. ते भोजन बनविण्यासाठी असलेले किचन शेड परिसर गवत आणि झाडे झुडपे यांच्यात अडकून पडला होता. नेरळ केंद्राचे प्रभारी केंद्र प्रमुख रवींद्र सोनावले यांना शाळेत पाठवून शाळा परिसराची माहिती घेतली. शाळेच्या इमारतीचे मागील बाजूस असलेले किचन शेड यांचे फोटो केंद्र प्रमुख सोनवले यांनी गटशिक्षण अधिकारी यांना पाठवले. त्यावेळी शिक्षण अधिकारी यांनी त्या परिसराची स्वच्छता खासगी मजूर घेवून करण्याची सूचना केल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीकडून शाळेच्या परिसराची स्वच्छता करून घेण्यात आली. त्याबद्दल गटशिक्षण अधिकारी संतोष दौंड यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या तत्परते बद्दल कौतुक केले. तसेच पुढील महिन्यात किचन शेड नवीन जागेत असेल अशी ग्वाही त्यांनी दिली.