दासभक्तांनी केली झाडांची साफसफाई

। जेएनपीटी । वार्ताहर ।
चिरनेर-विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील ओसाड टेकडीवर विविध जातींच्या झाडांची लागवड व संवर्धन करण्याचे काम डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाच्या माध्यमातून उरण तालुक्यातील दासभक्तांनी हाती घेतले आहे. अशा झाडांना उन्हाळ्यात आग लागून सदर झाडे जळून नष्ट होणार नाहीत याची खबरदारी म्हणून रविवारी (दि.17) झाडांमधील वाढलेले गवत काढण्याचे काम हाती घेतले आहे.
उरण तालुक्यातील दासभक्तांनी चिरनेर- विधणे ग्रामपंचायत हद्दीतील ओसाड टेकडीवर आंबा, काजू, फणस, जांभूळ, पेरु व इतर विविध जातींच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. या ओसाड टेकडीवर लागवड करण्यात आलेल्या झाडांवरील फळे खाण्यासाठी तसेच निवारा घेण्यासाठी विविध जातींचे पक्षी, फुलपाखरे, ससा व इतर वन्य प्राणी मुक्त संचार करत आहेत. परंतु काही नागरीक या टेकडीवर उन्हाळ्यात आग लावून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशा झाडांचे संवर्धन, जतन करण्यासाठी व उन्हाळ्यात लागणार्‍या आगीतून सुटका करण्यासाठी उरण तालुक्यातील दासभक्तांनी रविवारी (दि.17) सदर टेकडीवर पावसाळ्यात वाढलेले गवत काढण्याचे काम एकदिलाने हाती घेतले. यावेळी सामाजिक संस्था, विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभाग घेऊन हातभार लावला.

Exit mobile version