गणेशोत्सवाआधी खारीतील तलावाची सफाई

चौलमळा ग्रामस्थांनी घडविले एकीचे दर्शन
| चौल | प्रतिनिधी |

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर चौलमळा ग्रामस्थांनी श्रमदान करीत खारीतील तलावाची स्वच्छता केली. स्वच्छतेमध्येच देव हाय… हा विचार पटवून देणार्‍या संत गाडगेबाबांच्या विचारातून प्रेरणा घेत ग्रामस्थांनी तलावाच्या साईडपट्टीची साफसफाई केली. या तलावाचा वापर गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. त्यासाठी ग्रामस्थ मेहनत घेत असतात.

अलिबागपासून साधारण 12 किलोमीटर अंतरावर अलिबाग-रेवदंडा मुख्य रस्त्यालगत चौलमळा गाव वसले आहे. गावातील कोणतेही काम हे ग्रामस्थांच्या एकीतूनच केले जाते. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील गणेशोत्सवाआधी तलावाची साफसफाई करण्याचा निर्णय गावप्रमुख रवींद्र घरत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला होता. त्याप्रमाणे खारीतील तलाव परिसरात वाढलेले गवत, झाडीझुडपांची साफसफाई करण्यात आली. रविवार, दि. 21 ऑगस्ट रोजी सर्व ग्रामस्थांनी सकाळी आठ वाजल्यापासून स्वच्छता मोहीम हाती घेत अवघ्या काही तासाच हा तलाव परिसर चकाचक केला. ‘गाव करील ते राव काय करील’ ही म्हण ग्रामस्थांनी सार्थ ठरविली आहे. ही स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी गावचे प्रमुख रवींद्र घरत, उपप्रमुख जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी जास्तीत जास्त ग्रामस्थांनी सहभागी होत स्वच्छता मोहीम यशस्वी केली. याबद्दल गावप्रमुख श्री. घरत यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Exit mobile version