। म्हसळा । वार्ताहर ।
कोकण उन्नती मित्र मंडळाचे अध्यक्ष व मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, सचिव अशोक तळवटकर, खजिनदार वंदना विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवेआगर समुद्रकिनारी स्वच्छ सागर, सुरक्षित सागर या मोहिमेअंतर्गत वसंतराव नाईक कला, वाणिज्य महाविद्यालय आणि बॅरिस्टर ए. आर. अंतुले विज्ञान महाविद्यालय आणि दिवेआगर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
दिवेआगर ग्रामपंचायतीचे सरपंच सिद्धेश कोजबे यांनी विद्यार्थ्यांना समुद्रकिनार्याचे महत्त्व समजावले. सरपंचांनी उपस्थितांना आवाहन केले की, स्वच्छता राखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. समुद्रकिनारा केवळ आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे आकर्षण नाही, तर तो स्थानिक समुदायासाठी जीवनाच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यांनी समुद्रकिनार्यावर स्वच्छता अभियानाची आवश्यकता आणि त्याच्या पर्यावरणीय परिणामांवर प्रकाश टाकला.