। वावोशी । वार्ताहर ।
महात्मा गांधी जयंतीनिमित्त जांभीवली येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद) अभियान अंतर्गत स्थापन झालेल्या शिवशक्ती ग्रामसंघातील महिलांनी गावात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. टाटा स्टील फाउंडेशनच्या दिशा उपक्रमातून प्रेरणा घेत महिलांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. चार दिवसांच्या नेतृत्व प्रशिक्षणामुळे त्यांना नेतृत्व कौशल्य व समुदाय सहभागाचे महत्त्व समजल्याने त्यांनी गावाच्या स्वच्छतेसाठी हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केला आहे.
या उपक्रमाकरिता टाटा स्टील फाउंडेशनकडून स्वच्छता करण्याकरिता साहित्य पुरविण्यात आले होते. यावेळी ग्रामसंघातील महिलांनी सर्व ग्रामस्थांना या स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने गावातील सर्व महिला या स्वच्छ्ता अभियानात मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. यावेळी या उपक्रमाला गावातील सर्व नागरिकांचेदेखील सहकार्य मिळाले. यावेळी टाटा स्टील फाउंडेशनच्या असिस्टंट मॅनेजर हिमाद्री यादव, करुणा कदम, अर्चना दळवी, जयवंती शिर्के, तानाजी मोरे, रूपाली पाटील तसेच दिशा कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या प्रशिक्षणार्थी व शिवशक्ती ग्रामसंघातील सर्व महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.