रायगड किल्ला परिसरात सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने स्वच्छता मोहीम

| खरोशी | वार्ताहर |

अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 351 व्या राजाभिषेक दिनानिमित्त तसेच सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानच्या 16 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दुर्गराज रायगड येथे स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती.

राज्याभिषेक सोहळ्यानंतर किल्ले रायगडावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर कचरा साचतो. त्यामुळे गडाचे पावित्र्य टिकून राहत नाही. या मोहीमेच्या निमित्ताने सह्याद्रीच्या अनेक विभागांच्या दुर्गसेवकांनी मिळून रायगड किल्ला परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. रात्री गडावर व आसपासच्या परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. तरीही सह्याद्रीच्या जवळपास 225 दुर्गसेवकांनी सकाळी लवकर गडावर मोहीमेसाठी हजेरी लावली. त्या सर्व दुर्गसेवकांना तीन समूहात विभागून त्यांनी गडावरील जगदीश्‍वर मंदिर ते भवानी टोक परिसर, होळीचा माळ ते वाघ दरवाजा परिसर आणि शिरकाई देवी मंदिराच्या मागे अन्नछत्र (जिल्हा परिषद शेड), हत्ती तलाव परिसरातील कचरा, मोकळ्या पाणी बॉटल, प्लास्टीकचा कचरा मोठ्या प्रमाणावर गोळा केला. मोहीमेतील दुर्देव हे की जगदीश्‍वर मंदिराच्या मागील बाजूस भवानी टोकाकडे जाताना त्या परिसरात रिकाम्या दारूच्या बाटल्या सुद्धा सापडल्या. जवळपास अर्धे पोते भरेल एवढ्या दारूच्या बाटल्या गोळा करून त्या वाहून आणण्यात आल्या. रायगडसारख्या किल्ल्यावर असे प्रकार सुरु आहेत हि फार मोठी शोकांतिका आहे.

खरेतर राज्याभिषेक सोहळा झाल्यावर अनेक शिवप्रेमी व दुर्गप्रेमी संस्थांच्या सदस्यांनी रायगडावर येऊन गडावरचा कचरा गोळा केला होता. त्यामुळे गडमाथ्याच्या आजूबाजूला अवघड दर्‍यांमध्ये पडलेला कचरा गोळा करण्याची जबाबदारी सह्याद्रीच्या दुर्गसेवकांवर आली आणि ती जबाबदारी सर्वांनी चोख पार पाडली. एवढेच नाही तर सर्वांनी गोळा केलेला कचरा पायरी मार्गाने प्रत्येक दुर्गसेवकाने गडाच्या खाली आणला आणि प्रशासनाच्या ताब्यात दिला. अशा किती स्वच्छता मोहीमा करणार आणि किती कचरा साफ करणार! तरीही गड पूर्णपणे प्लास्टीकमुक्त होत नाही. दुर्गसेवकांनी गोळा केलेला सर्व कचरा गडाखाली आणताना एक गोष्ट निदर्शनास आली की गडाच्या महादरवाज्याच्या खाली पायरीमार्गाच्या आजूबाजूला अजूनही प्रचंड मोठ्या प्रमाणावर रिकाम्या प्लास्टीकच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. यावरून एकच वाटते की प्रशासन (रायगड विकास प्राधिकरण) यांनी गडावर प्लास्टीकबंदी केलीच पाहीजे. त्याशिवाय रायगडाचे पावित्र्य जपले जाणार नाही, अशी मागणी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्ताने केली आहे.

Exit mobile version