रायगडात स्वच्छतेचा जागर

एकाच दिवशी 7,998 किलो कचरा संकलन; 20 हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर करण्यात आला. शुक्रवारी (दि.16) एकाच दिवशी जिल्ह्यातील ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाडी व आरोग्य केंद्रांमध्ये राबविण्यात आलेल्या सामूहिक स्वच्छता मोहिमेत तब्बल 7 हजार 998 किलो प्लास्टिक व सुका कचरा संकलित करण्यात आला. या अभियानात अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

स्वच्छता ही केवळ मोहीम न राहता आरोग्याची सवय बनावी, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या अभियानात जिल्ह्यातील 20 हजार 281 जण सहभागी झाले होते. घरासह परिसर स्वच्छ राहिल्यास रोगराईवर नियंत्रण मिळते, या जाणीवेतून ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, शाळा परिसर, आरोग्य केंद्रे व गावातील मोकळ्या जागांमधील कचरा गोळा करण्यात आला. संकलित कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली आहे.

या अभियानात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे तसेच स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी माणगाव तालुक्यातील वरचीवाडी व तळाशेत येथे प्रत्यक्ष सहभाग घेऊन ग्रामस्थांचा उत्साह वाढविला.

श्रीवर्धन तालुक्यातील रानवली ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून स्वच्छतेचे महत्त्व प्रभावीपणे पटवून दिले.

एक नजर आकडेवारीवर
एकूण सहभागी :
20,281
एकूण कचरा संकलन : 7,998 किलो
2,473 शाळा : 2,012 किलो
809 ग्रामपंचायती : 3,269 किलो
336 आरोग्य व उपकेंद्रे : 716 किलो
3,161 अंगणवाड्या : 1,580 किलो

स्वच्छता ही एकदिवसीय उपक्रम न राहता लोकांची सवय व्हावी, हा या अभियानाचा उद्देश आहे. ग्रामस्थ, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून समाधान वाटते. रायगड जिल्हा स्वच्छतेच्या बाबतीत आदर्श ठरेल, यासाठी सातत्याने असे उपक्रम राबवले जातील.

– नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद

Exit mobile version