| सोगाव | प्रतिनिधी |
अलिबाग नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन बच्छाव आणि द लाईफ फाउंडेशनच्या सहसंस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त पूनम अजित लालवानी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (दि.9) सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर गणेश विसर्जनानंतरची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या उपक्रमात अलिबाग नगरपरिषदेचे आरोग्य व स्वच्छता कर्मचारी, नगरपरिषदेचे अधिकारी व द लाईफ फाउंडेशनच्या स्वयंसेवकांसह एकूण 54 जणांनी सहभाग घेतला. तसेच समुद्रकिनाऱ्यावरील कचरा व अवशेष दूर करून किनाऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य पुन्हा खुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
गणेश विसर्जन हा आनंद व श्रद्धेचा उत्सव असला तरी त्यानंतर पर्यावरणीय आव्हाने उभी राहतात. समाज म्हणून एकत्र येऊन आपण जबाबदारीला कृतीत रूपांतरित करू शकतो आणि त्यामुळे आपले समुद्रकिनारे स्वच्छ, निरोगी व सुरक्षित होऊ शकतात, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी अलिबाग नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक धनंजय आंब्रे, सहाय्यक नगररचनाकार सौरभ खरात, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता प्रियांका मोरे, शहर समन्वयक आर्या जाधव तसेच द लाईफ फाउंडेशनचे कार्यक्रम व्यवस्थापक शिलानंद इंगळे, सोशल वर्कर प्रणय ओव्हाळ व राखी राणे यांनी विशेष परिश्रम घेतले.







