कनकेश्‍वर देवस्थान परिसरात स्वच्छता मोहीम

| अलिबाग | वार्ताहर |

टुडेस युथ सोशल फाऊंडेशन आणि वाइल्डलाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकतीच कनकेश्‍वर देवस्थान परिसर स्वच्छता मोहीम पार पाडण्यात आली.

कनकेश्‍वर देवस्थान हे रायगड जिल्ह्यातले सर्वात प्राचीन भगवान शंकराचे देवस्थान आहे. निसर्गरम्य परिसर असल्याने भाविक आणि पर्यटकांची गर्दी नेहमीच येथे दिसून येते. परंतु, देवस्थान परिसर आणि संपूर्ण डोंगर येथे प्रचंड प्रमाणात प्लास्टिक पिशव्या, खाद्य पदार्थांचे रॅपर, पाण्याच्या तसेच शीतपेयांच्या बाटल्या इत्यादी कचरा दिसून येतो. हाच कचरा टीवायएसएफ आणि डब्ल्यूडब्ल्यूएच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी स्वच्छ केला तसेच पर्यटकांना कचरा न टाकण्याची विनंती केली.
कनकेश्‍वर देवस्थान परिसरात आणि पायर्‍यांजवळ होणारा हा कचरा देवस्थानाच्या पावित्रास धक्का पोहोचवत आहेच; परंतु इथे आढळणार्‍या वन्य प्राण्यांच्यासुद्धा जीवावर बेतत आहे. येथील कचर्‍याच्या विल्हेवाटीसंदर्भात नियोजन करणे अत्यंत आवश्यक असून, त्यात कनकेश्‍वर देवस्थान विश्‍वस्त आणि स्थानिक प्रशासन ह्यांनी लक्ष घालणे फार आवश्यक असल्याचे डब्ल्यूडब्ल्यूएचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रसाद दाभोळकर यांनी नमूद केले. तसेच ह्या कचर्‍याच्या विल्हेवाटीसाठी टीवायएसएफचे अध्यक्ष निखिल जैन आणि त्यांची टीम परिश्रम घेत आहेत.

Exit mobile version