निरोगी समाजासाठी स्वच्छता महत्त्वाची: डाॅ. श्रीशैल बहिरगुडे

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

स्वच्छतेसाठी काम करणे हीच खरी समाजसेवा आहे. नागरिकांनी व्यक्तिगत स्वच्छतेसोबत सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे; तरच शहर व आपलं गाव स्वच्छ व सुंदर बनेल. निरोगी समाजासाठी स्वच्छता महत्वाची आहे, असे मत डॉ. श्रीशैल बहिरगुडे यांनी व्यक्त केले. ते तेलवडे येथे मुरूड कोकण उन्नती मित्र मंडळाचे वसंतराव नाईक महाविद्यालय, मुंबई विद्यापीठ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना श्रम शिबीर कार्यक्रमावेळी बोलत होते.

आपले घर व आजुबाजूचा परिसर हे नेहमीच स्वच्छ ठेवले जाईल, यांची काळजी सर्वांनी घेतली तर आपोआपच पर्यटकांची संख्या या ठिकाणी वाढेल आणि आपल्याला या पर्यटनाच्या माध्यमातून चांगला रोजगार उपलब्ध होईल. तरी सर्वांनी स्वच्छतेचे महत्त्व जाणले पाहिजे, असे मत यावेळी डॉ. गजानन मुनेश्वर यांनी व्यक्त केले.

शनिवारी सकाळी वसंतराव नाईक महाविद्यालयाचे एनएसएस युनिट १० च्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण तेलवडे गाव स्वच्छ व सुंदर केला. यावेळी प्राचार्य डॉ. जनार्दन कांबळे, एनएसएस युनिट १० चे प्रमुख, श्रीशैल बहिरगुडे, डॉ. गजानन मुनेश्वर डॉ. सुभाष म्हात्रे, माजी प्रभारी प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version