स्वच्छतागृहांची स्वच्छता वाऱ्यावर

उरण नगरपरिषदेने फिरवली पाठ; तहसीलदार, पोलीस झाले हतबल

| उरण | वार्ताहर |

उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव यांनी सातत्याने उरण तहसील कार्यालय व उरण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील शौचालयाच्या स्वच्छतागृहांकडे दुर्लक्ष केल्याने मोठ्या प्रमाणात शौचालयाची दुरवस्था झाली आहे, अशी चर्चा आहे. दरम्यान, त्याचा त्रास शासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणेबरोबर तालुक्यातील नागरिकांना सहन करावा लागत असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

उरण तहसील कार्यालय व पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उरण नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग उरण यांच्या कार्यक्षेत्रात उरण तहसील कार्यालय व तालुक्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे उरण पोलीस ठाणे यांची एकाच ठिकाणी कार्यालय आहेत. या दोन्ही महत्त्वाच्या परिसरातील इमारतींची दुरुस्ती करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग उरण व स्वच्छतेबाबत उरण नगर परिषद महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, दोन्ही कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील शौचालयाच्या स्वच्छतागृहाकडे व परिसरातील स्वच्छतेकडे सार्वजनिक बांधकाम विभाग उरण व उरण नगर परिषद दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न गहन बनला आहे. त्याचबरोबर शौचालयात पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने व घाणीचे साम्राज्य पसरल्याने शासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणेबरोबर कार्यालयात ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तरी ही उरण नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग उरण हे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव यांच्याकडे वारंवार मोबाईल फोनवरून संपर्क साधला असता मार्चअखेर असल्याने सध्या ते विकासकामातील ठेकेदारांची बिले काढण्यात दंग असल्याचे समजत आहे.

Exit mobile version