जिल्ह्यात 2 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता सेवा अभियान

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या वतीने शासनाच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार 15 सप्टेंबरपासून जिल्ह्यात स्वच्छता सेवा अभियानांतर्गत गावे स्वच्छ, सुंदर करण्यावर भर दिला जात आहे. हे अभियान 2 ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांनी दिली.
स्वच्छता सेवा अभियानांतर्गत 19 सप्टेंबरपर्यंत स्वच्छतेमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या व्यक्तींचा सत्कार तसेच शोषखड्डे, कंपोस्ट खड्डे बनविण्यात येणार आहेत. 20 ते 21 सप्टेंबरदरम्यान तालुका व ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये शासकीय व सार्वजनिक इमारतींची स्वच्छता, प्लास्टिक कचर्‍याचे संकलन त्याचे व्यवस्थापन तसेच गावागावात वृक्षलागवड करण्यात येणार आहे. तसेच 21 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान गावागावात प्लास्टिक बंदीबाबत शपथ व ठराव मंजूर करणे, सरपंचांसोबत ई-संवाद साधणे, ओडीएफ प्लसबाबत ग्रामसभेत ठराव घेण्यात येईल. तर, 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत दिवसाचे आयोजन व गावे ओडीएफ प्लस घोषित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत गावे स्वच्छ सुंदर होण्यास मदत होणार आहे. या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य, पंचायत समिती पदाधिकारी व सदस्य, ग्रामपंचायतस्तरावरील सरपंच व सदस्य सर्व कर्मचारी, स्वयं सहाय्यता बचत गट या सर्वांचा सहभाग घेण्यात यावा, सदर उपक्रमांचे सनियंत्रण करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी (पंचायत) यांची नेमणूक करण्यात यावी, अशा सूचना संबंधित विभागांना करण्यात आल्या आहेत. विविध उपक्रमांची अंमलबजावणी विहीत वेळेत होण्यासाठी आणि जिल्हास्तरांवर अहवाल सादर करण्याची जबाबदारी गट समन्वयक व समूह समन्वयक यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

Exit mobile version