परिवहनमंत्र्यांचे विभाग नियंत्रकांना आदेश
। नेरळ । वार्ताहर ।
माथेरानची मिनीबस सेवा पूर्ववत चालू करण्यात यावी, असे आदेश परिवहनमंत्री अनिल परब यांनी रायगड विभागाच्या विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांना दिले. त्यामुळे लवकरच माथेरान-कर्जत मिडीबस सेवा सुरु करण्याच्या मार्गातील अडथळे दूर झाले आहेत. दरम्यान, लवकरच माथेरान-कर्जत मिनीबस सुरु होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, परिवहनमंत्री अनिल परब यांची माजी नगराध्यक्ष अजय सावंत, माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी, शहर संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांनी त्यांच्या भेट घेऊन मिनीबस सेवा सुरु करण्याची मागणी केली होती. याबाबत अनिल परब यांनी रायगड विभागाच्या विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांना तसे आदेश दिले आहेत.
पेण येथील रायगड विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी कर्जत आगार व्यवस्थापक यांना विशेष बाब म्हणून तातडीने बससेवा सुरू करावी यासाठी सूचना करण्यास सांगितले. त्याअनुषंगाने कर्जत आगार व्यवस्थापक शंकर यादव यांना आदेश दिले. त्यानुसार मिनीबसचे सकाळपासून मेन्टेनेन्स, तपासणी तसेच चाचणी घेण्यात आली आणि तद्नंतर माथेरानकर आणि विद्यार्थ्यांसाठी पूर्ववत कर्जत-माथेरान सेवा सुरू करण्यात येत आहे.







