आ. जयंत पाटील यांच्या मागणीची दखल
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील देवघर येथील कब्रस्तानकडे जाण्याच्या मार्ग गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता. शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने हा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. विधान परिषद सभागृहात मंगळवारी विशेष उल्लेखाद्वारे केलेल्या मागणीची दखल सभापतींकडून घेण्यात आली असून त्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक मुस्लीम समाजाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
देवघर येथील गट क्रमांक 467 मधील एक हेक्टर जागा मुस्लीम समाजाच्या दफनभूमी कब्रस्तानसाठी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी 2 नोव्हेंबर 2020 रोजी दिले होते. परंतू पुर्वी देवघर गुरचरण जागेतून कब्रस्तानकडे जाण्यासाठी ज्या रस्त्याचा वापर करण्यात येत होता. त्या वहिवाटीचा रस्ता हा वन विभागाकडे वर्ग केल्यामुळे कब्रस्तानकडे जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला होता. मात्र, पर्यायी देण्यात आलेल्या रस्त्यामुळे कब्रस्तानकडे ये-जा करणे गैरसोयीचे व त्रासदायक होऊ लागले होते. देवघर येथील जमातूल मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने आ. जयंत पाटील यांची भेट घेत त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. यावेळी अध्यक्ष आकील पेणकर, अहमद अलिमिया दाविलकर, बद्रुदिन नाटूसकर, आमजेत मुखरी, फैरोज पेणकर, फैयाज नाटुसकर उपस्थित हेोते.त्यानंतर शेकापचे कार्यकर्ते प्रकाश खडपे यांनी पाठपुरावा करीत हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी पाटील यांच्याकडे केली. मुस्लीम समाज आणि प्रकाश खडपे यांच्या मागणीनुसार, कब्रस्तानकडे ये – जा करण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी जयंत पाटील यांनी विधान परिषदेमध्ये सभागृहात विशेष उल्लेखाद्वारे मागणी केली. त्याची दखलही सभागृहाने घेतल्याने लवकरच हा मार्ग मोकळा होणार आहे.