हवामान बदलाचा उन्हाळी भातशेतीला फटका

शेतीचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल

| माणगाव | प्रतिनिधी |

ढगाळ हवामान व कडक उन्हामुळे तालुक्यातील रब्बी हंगामातील भातशेती कापणीवर संकट आले असून, शेतकरी चिंतित झाले आहेत. माणगाव तालुक्यात साधारणतः 800 हेक्टर जागेवर रब्बी हंगामातील भातशेतीचे पीक घेण्यात आले आहे. सलग चौथ्या वर्षी शेतकर्‍यांना बिघडलेले हवामान, अवकाळी पाऊस व वादळ यांचा सामना करावा लागत असून, शेतीचे मोठे नुकसान होत आहे.

उन्हाळी भातशेती कापणीस तयार झाली आहे. तालुक्यात शेतकर्‍यांनी भातशेती कापण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे, तसेच पाऊस, ढगाळ वातावरणामुळे भातशेती कापणीवर संकट आले आहे.

कडक उन्हामुळे कापणीस आलेली भातशेती करपण्याचा धोका निर्माण झाला असून, ढगाळ वातावरणामुळे व अवकाळीमुळे शेतीचे नुकसान होत असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. तालुक्यात शेतीकामासाठी मजूरकरांचा तुटवडा असून, वाढलेली मजुरी परवडत नसल्याने कापणी करताना अनेक अडचणी येत असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

Exit mobile version