कुंडलिका सुळक्याची केली चढाई

मॅकमोहन हुले व टीमने सर करून फडकविला तिरंगा
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील प्रसिद्ध गिर्यारोहक व प्रस्तरारोहक मॅकमोहन हुले यांनी आपल्या गिर्यारोहक मित्रांसोबत पाटणूस गावाजवळील कुंडलिका सुळका नुकताच सर करून 550 फुटावर भारताचा तिरंगा फडकविला. या मोहिमेसाठी टीमला छू लेंगे आसमान हे नाव दिले गेले. ही अवघड मोहिम दोन दिवस चालली. या कठीण सुळक्यावर आत्तापर्यंत अवघ्या तीन मोहीम झाल्या असून मॅकमोहन यांच्या टीमने ही तिसरी मोहिम फत्ते केली आहे.

कुंडलिका सुळका मोहिमेच्या आधी विजय वर्धन इंद्रनील खुरंगुळे, किरण बेकावडे व मॅकमोहन या गिर्यारोहकांनी या ठिकाणची पहिल्यांदा पाहणी (रेखी) केली. त्यानंतर मोहिमेची पूर्वतयारी केली गेली. सर्व साधन/तंत्र सामग्री जमवली व प्रजासत्ताक दिनी सकाळी सुळक्यावर चढाई केली. यावेळी अनेक आव्हाने प्रस्तरारोकांना अनुभवायला मिळाली. नियमित सराव असल्याने सुरक्षेची काळजी घेऊन या सुळक्यावरील अंतिम टप्पा मॅकमोहन, इंद्रनील खुरंगुळे, योगेश विरकर या प्रस्तरारोहकांनी भारताचा ध्वज तेथे फडकवला व ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत गायले.

या मोहिमेत इंद्रनील खुरंगुळे, मॅकमोहन हुले, मानतु मंत्री, कृष्णा बचुटे, योगेश विरकर, अक्षय शेलार, ओम काकडे, अभिजीत जोतकर, प्रशांत कुंभार, हे गिर्यारोहक सहभागी झाले होते.

धोकादायक चढाई
या संपूर्ण चढाई मध्ये मुक्त चढाईवर जास्त भर देण्यात आला आहे. फ्रेंड्स, चोकनटस, बोल्ट, पिटोन्स, मेखा या साधनांचा परिणामकारक वापर करण्यात आला. शेवटच्या टप्प्यामध्ये ठिसूळ खडक, माती व गवत असल्याने चढाई अत्यंत धोकादायक होती. या सगळ्यांवर मात करत दोन दिवसात ही चढाई पूर्ण करत मॅकमोहन यांनी तिसरे पाऊल या सुळक्यावर ठेवले.

Exit mobile version