| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईतून ट्रेकिंगसाठी आलेल्या एका ग्रुपमधील तरुणाचा मुरबाडच्या सिद्धगडावर दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी मुंबई येथून सिद्धगड येथे गिर्यारोहणासाठी 14 जणांचा चमू आला होता. त्यातील साईराज चव्हाण हा 22 वर्षीय तरुण गडावरून तोल जाऊन दरीत पडला. साईराज धनेश चव्हाण (22), रा. तळोजा, मूळगाव दहिगाव, सातारा असे या मृत तरुणाचे नाव आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्याचा शोध घेतला जात होता. अखेर मंगळवारी या तरुणाचा मृतदेह शोधून काढण्यात आला. डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याचा तीव्र प्रवाह, पाऊस, दाट धुके, निसरडे झालेले खडक यामुळे तरुणाला शोधण्यात अडथळे येत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, साईराज चव्हाण हा अत्यंत धाडसी होता. त्याने आतापर्यंत अनेक किल्ले सर केले होते. त्याची भारतीय लष्करात जाण्याची इच्छा कायम होती. साईराज चव्हाण हा रविवारी नवी मुंबईतील 14 जणांच्या ग्रुपसोबत सिद्धगडावर आला होता. मात्र, किल्ल्यावर चढत असताना तोल जाऊन तो खोल दरीत पडला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि स्थानिक बचाव पथकांनी उर्वरित 13 जणांना किल्ल्यावरुन सुखरुप खाली आणले. मात्र, मुरबाड परिसरात सुरु असणाऱ्या जोरदार पावसामुळे आणि खराब हवामानामुळे साईराज चव्हाण याचा मृतदेह शोधण्यासाठी दोन दिवस लागले. साईराज चव्हाण हा दरीत पडल्यानंतर त्याचा शोध सुरु होता. मात्र, रविवारी ते सोमवार सकाळपर्यंत त्याचा मृतदेह सापडला नव्हता. अखेर सोमवारी दुपारी त्याचा मृतदेह दरीत दिसला. मात्र, जोरदार पाऊस, डोंगरावरील निसरड्या वाटा आणि धुक्यामुळे हा मृतदेह दरीतून वर आणणे कठीण होऊन बसले. अखेर मंगळवारी दुपारी तीन वाजता साईराज चव्हाण याचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला आणि त्यानंतर मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला.