। पनवेल । प्रतिनिधी ।
मुंबई पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे जखमी महिला गिर्यारोहकांचे प्राण वाचले आहेत. मुंबई पोलिस दलातील क्विक रिस्पॉन्स टीमच्या जवानांनी ही कामगिरी केली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा किल्ल्यावर शनिवारी ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
शनिवारी रायगडमधील कर्नाळा किल्ल्यावर काही गिर्यारोहक ट्रेकिंगसाठी गेले होते. त्यात एका महिला ट्रेकरला झालेल्या अपघातात महिला जखमी झाली. पोलिसांच्या क्विक रिस्पॉन्स टीममध्ये नवीन भरती झालेले जवान कर्नाळा किल्ल्यावर प्रशिक्षण घेत होते. या वेळेस ट्रेकवरून खाली उतरत असताना, एका महिला ट्रेकरला जखम झाल्याचे जवानांना लक्षात आले. कोणतेही बचाव पर्याय उपलब्ध नसताना, जवानांनी त्यांच्या ट्रॅकसूटचा वापर करत तात्पुरते स्ट्रेचर बनवले. तसेच, जखमी महिलेला 2 तासांत बेस कॅम्पवर आणले. त्यानंतर महिलेला वैद्यकीय मदतीसाठी योग्यरित्या रुग्णालयात हलवण्यात आले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या क्विक रिस्पॉन्स टीमच्या सदस्यांनी जखमी ट्रेकरला सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचण्यास मदत केली. पोलिसांच्या प्रयत्नांनंतर महिलेची सुखरूप सुटका झाली.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मुंबई पोलिसांकडून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये, मुंबई पोलिसांच्या क्विक रिस्पॉन्स टीमची एका जखमी महिलेला कर्नाळा किल्ल्याच्या जंगलातून सुखरूप घेऊन जाताना दिसत आहे. पोलीस पथक दुखापत झालेल्या महिलेला स्ट्रेचरवर काळजीपूर्वक नेताना दिसत आहेत. या घटनेनंतर मुंबई पोलिसांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.