दोन दिवस अवजड वाहतूक बंद

नियमांचे पालन करण्याचे आवाहन

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी (दि.16) राज्य शासनाकडून महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा सोहळा खारघर, नवी मुंबई येथे पार पडणार आहे. दरम्यान, लाखो श्रीसदस्य या सोहळ्या उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न उद्भवू नये यासाठी  या मार्गावरील अवजड वाहतूक दि. 14 ते 16 दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश जाहीर करण्यात आले आहेत. तरी, नागरिकांनी नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.

दरम्यान, या सोहळ्याकरिता रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक आदी विविध जिल्ह्यांतून, बाहेरील राज्यांतून सुमारे 15 ते 20 लाख श्री सदस्य/अनुयायी त्यांच्या खासगी वाहनाने, एसटी बसेस तसेच रेल्वेने येणार आहेत. सद्यःस्थितीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बर्‍याच ठिकाणी बॉटलनेक पॉईट तयार झालेले आहेत, त्याचप्रमाणे दि. 14 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, दि.15 व 16 रोजी शनिवार व रविवार असे सलग तीन दिवस सुट्टी असल्याने नागरिक व पर्यटक तसेच श्रीसदस्य/अनुयायी हे मोठ्या संख्येने आपापली वाहने घेऊन सदर मार्गावरून प्रवास करणार आहेत. अशा वेळेस सदर मार्गावरून अवजड वाहतूक सुरू राहिल्यास मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्याकरिता सार्वजनिक हितास्तव वाळू/रेती भरलेले ट्रक, मोठे ट्रेलर्स तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत आदेश पारित करण्यात आलेले आहेत.

दि.14 रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते दि.16 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत खारघर ते इन्सुली सावंतवाडी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे जुना महामार्ग तसेच इतर राज्यमार्ग अशी सर्व वाहने ज्यांची क्षमता 16 टन किंवा 16 टन पेक्षा जास्त आहे, अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर इ. वाहने अशा सर्व वाहनांकरिता वाहतूक बंद करण्यात आली आहे.

यांना निर्बंधातून सूट
सदरचे निर्बंध दूध, पेट्रोल डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन, औषधे व भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्त वाहून नेणार्‍या वाहनांना लागू राहणार नाही. तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 च्या सत्ता रूंदीकरणा/रस्ता दुरुस्ती कामकाज आणि साहित्य, माल इत्यादी ने-आण करणार्‍या वाहनांना बंदी लागू राहणार नाही. सदर वाहतूकदारांनी संबंधित वाहतूक विभाग/महामार्ग पोलीस यांच्याकडून प्रवेशपत्र उपलब्ध करून घ्यावे. सर्व नागरिकांनी त्याची नोंद घ्यावी व सर्व वाहतूक नियमांचे पालन करून सहकार्य करण्याबाबत आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.

Exit mobile version