साखरचौथ गणेशोत्सवाची लगबग

मूर्तिकार गणेशमूर्ती बनविण्याच्या कामात दंग

। गडब । वार्ताहर ।

वर्षभर गणेशोत्सवासाठी मूर्ती बनविण्यात व्यस्त असणार्‍या गणेश मूर्तिकारांची आता साखरचौथ गणेशोत्सवासाठी लागणार्‍या मूर्ती बनविण्याची तयारी सुरु झाली आहे. पेण शहरासह तालुक्यातील मूर्तिकार सध्या या कामात गुंतलेले दिसून येत आहेत.

मोठया उत्साहात साजर्‍या होणार्‍या या साखरचौथ गणेशोत्सवासाठी येथील गणेशभक्त आगळ्यावेगळ्या गणेशमूर्ती मिळाव्यात, असा आग्रह मूर्तिकारांकडे करीत असतात. हे मूर्तिकारदेखील त्यांच्या मागणीला दुजोरा देऊन विविध प्रकारच्या रेखीव मूर्ती साकारण्याच्या तयारीला लागलेले पहायला मिळत आहेत.

पेण तालुक्यात साखरचौथ गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असे. मात्र, गेल्या सहा वर्षांपासून या उत्सवाचे स्वरुप बदलले आहे. घरगुती असणार्‍या या उत्सवाने सार्वजनिक स्वरुप धारण केले आहे. सार्वजनिक मंडळांची संख्या वाढली आहे.

चार दिवसांवर आलेल्या साखरचौथ गणेशोत्सवाची तयारीत मूर्तीकार व भाविक तसेच मंडळाचे पदाधिकारी गुंतले आहेत. तर बाप्पाच्या मागील महिरप किंवा विविध प्रकारचे सजावटीची तयारी आता सुरु असल्याचे चित्र पेणमध्ये मूर्तिकारांच्या कारखान्यात व गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे.
एक ते दीड फुटापासून दहा ते बारा फुटापर्यंत उंची असणार्‍या गणेशमूर्ती बनविण्याची तयारी पेणच्या मूर्तिकारांनी सुरु केली आहे. जिल्ह्यात इतर भागातही साखरचौथ गणेशोत्सवाची तयारी जोरदार सुरु आहे.

गेली दोन वर्षे साखरचौथ गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला; परंतु यावर्षी साखरचौथ गणेशोत्सवासाठी भव्यादिव्य तसेच विशेष प्रकारच्या मूर्तीची मागणी वाढली आहे.

निलेश पाटील, मूर्तिकार
Exit mobile version