मुरूड आगारात सीएनजी पंपाला नकार?

सर्वेक्षणानंतरही निर्णय होत नसल्याने मुरुडकरांची घोर निराशा

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरूड एसटी आगारात सीएनजी गॅस पंप उपलब्ध नसल्याने मुंबई-पुणे धावणाऱ्या बसेसना अलिबाग वा अन्यत्र गॅस भरावा लागतो. परिणामी प्रवाशांचा खोळंबा होत असून, नियत वेळेवर बसेस पोहचू न शकल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याची तक्रार होत आहे. मुरुड आगारात सीएनजी गॅस पंप कार्यान्वित व्हावा, अशी मुरुडकरांची वाजवी मागणी होती. तथापि ही मागणी पूर्ण होऊ शकणार नाही, असे कळल्याने सीएनजी गॅस पंप सुरु होण्याची शक्यता आता धुसर झाली आहे.

मुरूड – जंजिरा हे कोकणातील एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र असून ऐतिहासिक जंजिरा किल्ला, पद्मदुर्ग, समुद्रकिनारे, निसर्गसौंदर्य आणि येथील समृद्ध खाद्यसंस्कृतीच्या आकर्षणामुळे दरवर्षी लाखो पर्यटक इथे येत असतात. सर्वच पर्यटक खासगी वाहनांनी येतात असे नाही. अनेक पर्यटक सुरक्षित प्रवासाची हमी असलेल्या लालपरीला पसंती देतात. मात्र, अशा ठिकाणी सीएनजी पंपाचा अभाव असल्याने मुरूड आगारातील एसटी बस सेवेचे टाईम मॅनेजमेंट जुळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.

मुरुड आगारात आतापर्यंत 7 नवीन बस सोडल्या तर उर्वरित 30 गाड्या सीएनजी वरच धावत असून गॅस भरण्यासाठी त्यांना अलिबाग वा अन्यत्र थांबण्याखेरीज पर्याय नसल्याने वाहक-चालकांना प्रवाशांकडून शेलके संवाद ऐकायला मिळतात. त्यामुळे कधीकधी बाचाबाचीचे प्रसंग येतात. हे टाळण्यासाठी वाहक-चालकांकडून पुढे जाणाऱ्या प्रवाशांना गाडी अलिबागला किमान अर्धा तासतरी गॅस भरण्यासाठी थांबेल, अशी सूचना देत असल्याने प्रवासी मुरुडवरून अलिबाग पर्यंतच तिकीट काढून नवीन बसने प्रवास करतात. त्यामुळे मुरुड आगाराचे भारमान कमी होत आहे.

मुरूडला जागतिक पर्यटन नकाशावर आणणे आणि सागरकिनाऱ्याला ब्लू फ्लॅग मानांकन मिळवणे, अशा घोषणांमुळे पर्यटनवाढीची अपेक्षा व्यक्त होत असली, तरी मूलभूत पर्यटनपूरक सुविधा गांभीर्याने घेतल्या जात नसल्याचे चित्र आहे. मुरुडसारख्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळी सीएनजी गॅस पंप तातडीने सुरू करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. जिल्ह्यात माणगाव, श्रीवर्धन सारख्या ठिकाणी गॅस पंप सहज मंजुर केला जातो आणि मुरुडला नकारघंटा ही भूमिका अन्यायकारक असल्याची चर्चा मुरुडमध्ये रंगली आहे.

Exit mobile version