सावधान! किनारपट्टीवरील शहरांना धोक्याचा इशारा

समुद्राची पातळी वाढण्याचं संकट
। मुंबई । वृत्तसंस्था ।
जागतिक हवामान बदलाबाबत आयपीसीसीनं आशिया खंडातील देशांना गंभीर इशारे दिले आहेत. तापमान वाढीमुळे समुद्राची पातळी वाढण्याचा इशारा अहवालातून देण्यात आला आहे. आशियातील समुद्राची पातळी जागतिक दरापेक्षा वेगाने वाढत आहे, असं अहवालात सूचित करण्यात आलं आहे. त्यामुळे या शतकाच्या अखेरीस देशाच्या किनारपट्टीवरील मुंबईसह 12 शहरं पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. या शहरांमध्ये मुंबई, चेन्नई, कोची आणि विशाखापट्टणमचा समावेश आहे. शतकाच्या अखेरीस ही शहरं 3 फूट पाण्यात असतील असं सांगण्यात आलं आहे. 2006 ते 2018 या कालावधीत जागतिक समुद्राची पातळी दरवर्षी सुमारे 3.7 मिलीमीटर दराने वाढत आहे.

अंतराळ संशोधन संस्था नासानं आयपीसीसीच्या अहवालाचं मूल्यांकन केलं आहे. त्यानंतर भारतातील 12 शहरात शतकाच्या शेवटी पाण्याची वाढती पातळी जाणवण्याची शक्यता आहे. यापूर्वी 100 वर्षात असे बदल होत होते. मात्र 2050 नंतर दर सहा ते नऊ वर्षांनी असे बदल दिसतील असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 21 व्या शतकात समुद्राच्या पातळीत सतत वाढ होताना दिसेल. त्यामुळे समुद्राजवळील सखल भागात पाणी येण्याच्या घटना वाढतील. यापूर्वी 100 वर्षात असे बदल होत होते, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

Exit mobile version