। उरण । प्रतिनिधी ।
उलवे परिसरात राहून अमली पदार्थांची विक्री करणार्या एका नायजेरियन नागरिकाला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सोमवारी (दि.28) दुपारी अटक केली. जॉर्ज ओकान्टे डासिल्व्हा (35) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून तब्बल 1 कोटी 2 लाख 50 हजार किमतीचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. नायजेरियन नागरिकाविरोधात यापूर्वीही मुंबईतील नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
उलवे सेक्टर-25 ए मधील आर. एन. हाइट्स इमारतीमध्ये राहणारा एक आफ्रिकन नागरिक अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती.त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मराज बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका पाटील, शरद भरगुडे व त्यांच्या पथकाने सोमवारी दुपारी आर. एन. हाइट्स इमारतीमधील नायजेरियन नागरिक राहत असलेल्या फ्लॅटवर छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी जॉर्ज डासिल्व्हा याला ताब्यात घेतले. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने त्याच्याकडील अमली पदार्थ व इतर साहित्य जप्त केले आहे. तसेच आरोपी जॉर्ज डासिल्व्हा याच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याची 31 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. पोलिसांनी जॉर्जची व त्याच्या घराची झडती घेतली असता, घरातील बेडरूममध्ये एका पिशवीत 410 ग्रॅम वजनाचे 1 कोटी 2 लाख 50 हजार रुपये किमतीचे कोकेन आढळले. तसेच एक मोबाईल फोन, काळ्या रंगाचा 1 टॅनीटा कंपनीचा वजन काटा, एक कात्री, 10 पारदर्शक फ्लॅस्टिकच्या पिशव्या, एक स्काय बॅग, असा मुद्देमाल सापडला.







