आचारसंहिता डावलून सोहळ्याचे आयोजन

आमदारांसह सरपंच उमेदवाराकडून प्रलोभन
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. असे असतानाच अलिबाग तालुक्यातील खंडाळे ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटन सोहळ्याचे बॅनर थेट सरपंच पदाच्या उमेदवाराकडून प्रसिद्ध करून मतदारांना आमिष दाखविले जात आहे. यामुळे आमदार व सरपंच पदाच्या उमेदवाराकडून आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

निवडणूक काळात संबंधित क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात येते. अलिबाग तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील निवडणुका असलेल्या 210 ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे या परिसरात कसल्याही विकास कामांचे उद्घाटन, घोषणा, उमेदवारांनी अथवा राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी केल्यास आचारसंहितेचा भंग केल्याचे ठरते.

खंडाळा ग्रामपंचायत हद्दीत वायशेत मार्गे सहाण, शास्त्रीनगर ते चौल-रेवदंडाकरीता प्रादेशिक पाणी पुरवठा योजने अंतर्गत 28 कोटी 66 लाख निधींच्या कामाचा उद्घाटन सोहळा रविवारी (दि.29) सायंकाळी 4 वाजता नेहुली खंडाळा येथे आयोजित करण्यात आला आहे.

हा समारंभ शिंदे गटातील आ.महेंद्र दळवी आणि त्यांच्या पत्नी माजी जि.प. सदस्या मानसी दळवी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अशा प्रकारची बॅनरबाजी उमेदवाराकडून सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. शिंदे गटाचे थेट सरपंच पदाचे उमेदवार अशोक थळे यांच्या व्हॉट्सअँप स्टेटसवर देखील ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच गावातील अनेक गृपवर अशा प्रकारची जाहिरात प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे मतदारांना प्रलोभन दाखवून आचारसंहितेचा भंग केला जात असल्याने निवडणूक आयोगाकडे स्थानिक आमदार तसेच अशोक थळे यांच्या विरोधात आचार संहिता भंग केल्याची बाब निदर्शनास आली. दरम्यान, सरपंच पदाचे उमेदवार अशोक थळे यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी देखील यानिमित्ताने करण्यात आली आहे.

Exit mobile version