रायगड जिल्हा परिषदेचा शेतीनिष्ठ पुरस्कार लांबणीवर
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून उत्पादनात वाढ करणार्या जिल्ह्यातील शेतकर्यांना जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी कृषी दिनानिमित्त शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार दिला जातो. मात्र यंदा शेतकर्यांच्या सन्मानावर आचारसंहितेचा अडथळा निर्माण झाल्याने हा सोहळा लांबणीवर गेला आहे. जिल्ह्यातील तीसहून अधिक शेतकर्यांना पुरस्काराची प्रतिक्षा लागून राहिली आहे.
रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांचा सन्मान व्हावा यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी पुरस्कार देण्याचा निर्णय त्यावेळी घेतला. त्यानंतर माजी आ. पंडित पाटील अध्यक्ष असताना या सोहळ्याला मोठे स्वरूप प्राप्त झाले. शेतीवर नवनवीन प्रयोग करणारे, नवनवीन पिकांची लागवड करणारे तसेच आधुनिक सेंद्रिय शेतीवर भर देणार्या प्रगतशील शेतकर्यांचा दरवर्षी एक जूलैला शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील खेड्यापाड्यात राहणार्या शेतकर्यांना प्रोत्साहन मिळाले. तरुण मंडळी शेतीकडे वळू लागली. रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांना यावर्षी कृषी दिनानिमित्त पुरस्कार देण्यासाठी तालुका स्तरातून नावांची यादी मागविण्यात आली. गेल्या अनेक महिन्यांपासून त्याचे काम सुरु होते. एक जूलैला पुरस्कार मिळणार म्हणून शेतकरी देखील आनंदात होते. मात्र त्यांच्या या आनंदावर विरजन पडले आहे. लोकसभा निवडणूकीनंतर कोकण पदवीधर मतदार संघातील निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला. या कार्यक्रमामुळे एक जूलैला होणारा जिल्हा परिषदेचा शेतीनिष्ठ पुरस्कार सोहळा रद्द करण्यात आला. हा कार्यक्रम लांबणीवर गेला आहे. शेतकर्यांच्या सन्मानावर आचारसंहितेचा अडथळा निर्माण झाला आहे.
शेतकर्यांचा गौरव व्हावा यासाठी शेतीनिष्ठ पुरस्कार सोहळा जिल्हा परिषदेच्या वतीने सुरु केला. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना,हा कार्यक्रम व्यापक स्वरुपात करण्यात आला. परंतु आचारसंहितेमुळे यंदाचा जिल्हा परिषदेचा कृषी निष्ठ पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम होऊ शकला नाही. मात्र प्रशासनाने आचारसंहिता संपल्यावर तातडीने हा कार्यक्रम घेऊन शेतकर्यांचा सन्मान करावा, अशी मागणी होत आहे.
पंडित पाटील
माजी आमदार,
शेकाप
जिल्ह्यातील शेतकर्यांना शेतीनिष्ठ पुरस्कार जिल्हा परिषदेच्या वतीने दिला जातो. परंतु आचारसंहितेमुळे हा कार्यक्रम होऊ शकला नाही. या दिवशी रोपांची लागवड करून शेतकर्यांमध्ये शेतीचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. वरिष्ठांच्या सुचनेनूसार हा पुरस्काराचा कार्यक्रम लवकरच घेतला जाईल.
कृषी विभाग,
जिल्हा परिषद
