कोलाडचा पारा 40 अंशावर

। कोलाड । वार्ताहर ।

निरभ्र आकाश व कोरड्या वातावरणामुळे कोलाड परिसरातील तापमान 40 अंशावर गेल्यामुळे प्रचंड उष्मा जाणवु लागला आहे. तर, वातावरणात प्रचंड वाढलेल्या उष्म्याचा जनजीवनावर परिणाम होऊ लागला असुन कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नका, असा प्रशासनातर्फे इशारा देण्यात आला आहे. यामुळे तीन दिवस ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड वाढलेल्या उष्मामुळे शरीराला उन्हाचे चटके बसत आहेत. तर, दुपारी बाराच्या नंतर घरातून बाहेर पडताना कोणी दिसत नाही. तसेच जनावरे देखील तळी, डबकी व अन्य पाण्याच्या जागी, झाडांच्या सावलीचा आसरा घेत आहेत. तापमानाचा पारा येत्या काही दिवसांत आणखी वाढणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केल्याने पुढील दिवसात याही पेक्षा कठीण अवस्था राहणार आहे.

पावसाळी हंगामातील शेतीच्या पूर्व मशागतीची कामे यावेळेपर्यंत बर्‍याच अंशी पुर्ण झाल्याचे चित्र असते. परंतु, यावेळी लग्न सराई व प्रचंड उष्म्याने शेतीच्या मशागतीच्या कामावर परिणाम होऊ लागला आहे. जेमतेम सकाळी अकरा वाजेपर्यंत व नंतर चार वाजल्यानंतर शेतकरी वर्ग शेतीची कामे करीत आहेत. तर, प्रचंड वाढलेल्या उष्म्यामुळे मजुर मिळत नसल्याचे शेतकरी वर्गातुन बोलले जात आहे. या बदलत्या हवामानामुळे जनजीवनावर परिणाम झाल्यामुळे शेतकरी वर्ग व नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत.

Exit mobile version