झोंबतो गारवा अन् उबदार सूर्यकिरणं

वरंध भोर घाटाचे पर्यटकांना आकर्षण

| पोलादपूर | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातून पुणे तसेच पंढरपूरकडे जाण्यासाठी उपयुक्त असलेला वरंध भोर घाट सध्या रस्त्याची अवस्था काही मोजकीच ठिकाणे वगळता इतरत्र सुस्थितीत असल्याने अतिशय वर्दळीचा ठरत आहे. पावसाळयानंतर वाघजाईमंदिरासमोरील धबधब्यांचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची होणारी गर्दी आता थंडीच्या मौसमात झोंबतोय गारवा अन् उबदार सुर्यकिरणं अंगावर घेण्यासाठी आवर्जून थांबत आहे.

वरंध घाटाच्या चढावरून समर्थ रामदासस्वामींची आनंदवनभुवन ही कुंभारकोंड हद्दीतील शिवथरची खरी घळ समोरच्या डोंगरातून शोधून पाहण्याचा चौकस दृष्टीकोन लाभलेले पर्यटक ही घळ दिसली की आनंदाने पुढील प्रवासाला मार्गस्थ होत असतात तर पुढे माझेरी वनविभागाच्या तपासणी नाक्यालगतचा कावळा किल्ला की वाघजाई मंदिरापूर्वीच्या वळणावर नामफलक लावलेला कावळा किल्ला असा प्रवाशांना प्रश्‍न पडतो. अशातच, वाघजाई मंदिरासमोर सह्याद्रीची विविध भुरूपे पाहण्यासोबतच माकडचेष्टांचा आनंद घेण्यासाठी या मार्गावरील वाटसरू प्रवासी आपआपल्या वाहनांतून उतरतात. हातात मोबाईल कॅमेरा घेऊन सेल्फी आणि फोटोग्राफी करण्यासाठी कुटूंब आणि मित्रपरिवार वाहनांतून खाली उतरताना दरीतून वार्‍याची झुळूक अंगाला झोंबतो गारवा अशी अनुभूती देऊन जाते. कांद्याची गरमागरम खेकडाभजी आणि वाफाळलेला चहा अन् सोबतीला अगदीच झणझणीत बटाटा वडापाव भूक भागविण्याचे काम करतात तर भाविकांना माकडांसाठी केळयांचे घड आणि वाघजाईदेवीला खणासोबत नारळ द्यावेसे वाटतात. अर्धा पाऊण तास वाघजाईतील हा सर्व सोहळा प्रत्येक प्रवासी अनुभवत पुन्हा आपआपल्या वाहनांत बसतो.

या वरंध-भोर घाटात नेकलेस पॉईंट, नीरा देवधर धरण तसेच धरणाच्या बॅकवॉटर जलाशयासभोवती अपेक निसर्गरम्य आणि नयनमनोहारी पॉईंटस् आहेत. जेवणासाठी शाकाहारी, मांसाहारी हॉटेल्सही आहेत आणि सर्वात महत्वाचे आयुर्वेदीक महत्व असलेली निरा हे अवीट गोडीचे थंड पेय म्हणून सर्वश्रृृत असल्याने आपटी या गावात गेल्या चाळीसहून अधिक वर्षे प्रवासी वर्गाची तहानही भागविण्यात लोकप्रिय झाले आहे.

लाल पेरु,अंजिराचा आस्वाद
सध्या आतून लाल असलेले पेरू आणि आतून लाल असलेल्या अंजिर फळाचा हंगाम असल्याने पर्यटक आवर्जून या फळांसाठी हातगाडयांभोवती गर्दी करीत आहेत. पहाटेच्या सुमारास धुक्यातून वाहनांची वाटचाल सुरू असताना अचानक सोनेरी सूर्यकिरणांची उधळण होऊन उबदार दिवस सुरू होतो तसेच सायंकाळी भोर आणि वरंध घाटात सोनेरी किरणांच्या अस्ताने नागमोडी अंधारवाटा वाहनचालकांना आव्हानात्मक ठरतात. मात्र, प्रवासासोबत पर्यटनाचा असीम आनंद देणार्‍या या घाटातील सृष्टीसौंदर्य नेहमीच भुरळ घालणारे ठरले आहे.

Exit mobile version