। नविन पनवेल । वार्ताहर ।
खारघरमध्ये हिवताप आणि डेंग्यू आजाराने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. जुलै महिन्यात हिवतापाचे आठ आणि डेंगीचे चार रुग्ण आढळून आल्यामुळे पालिकेने धुरीकरणासोबत फवारणीवर भर दिला आहे. खारघर वसाहतीत काही सेक्टरमध्ये मलनि:सारण वाहिन्या भरल्याने रस्त्यावरून दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे.
तुंबणार्या पाण्यामुळे काही भागात पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे डासांची उत्पती वाढली आहे. बेलपाडा गाव सेक्टर 10, 11, 12 आणि भारती विद्यापीठासमोरील रस्त्यावर पावसाळ्यात मलनिःसारण वाहण्याचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. आजही परिसरातील गावातील रस्ते, गटारे तुंबलेली आहेत. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढल्याने ताप हिवतापाच्या रुग्णांत वाढ होत आहे. पालिकेने सिडकोच्या भूखंडावर कचरा डम्पिंग करीत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून रोगराई पसरण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.